नागपूरात मेट्रो ट्रायलची युद्धस्तरावर पूर्वतयारी

0
12

नागपूर,दि.04-  महा मेट्रो रेल्वेतर्फे मिहान डेपो ते न्यू एयरपोर्टपर्यंत या दरम्यान ट्रायलची तयारी अंतिम टप्प्यात असून या महिन्यात होणार्‍या ट्रायलच्या अनुषंगाने विविध तयारीला सुरुवात झालेली आहे.
शेकडो कर्मचारी आणि अधिकारी या तयारीत गुंतले आहेत. मिहान डेपो ते न्यू एयरपोर्टपर्यंत ओएचई लाईनचे काम पूर्ण झाले आहे. विद्युत प्रवाह सुरू करून वेगवेगळ्या केंद्रबिंदूंची मेट्रो ट्रायल घेण्यात येत आहे. आरडीएसओ लखनऊच्या तांत्रिकी विशेषज्ञांची चमू या महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नागपुरात पोहचेल. हे विशेषज्ञ झालेल्या कार्याचे सूक्ष्म निरीक्षण करून मेट्रो ट्रेनची स्वत: ट्रायल घेतील. सध्या सुरू असलेली तयारी पूर्णत: आरडीएसओ मापदंडाच्या आधारावर केली जात आहे, जेणे करून आरडीएसओ ट्रायलमध्ये महा मेट्रो यशस्वी होऊ शकेल. विद्युत आवक आणि पॉवर ट्रॅक्शन प्रणालीची सुद्धा अनेकवेळा चाचणी घेण्यात आली आहे. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली मेट्रोची चमू आरडीएसओच्या ट्रायल रनसाठी गुंतलेली आहे. रेल्वे रुळाच्या परीक्षणासाठी पेट्रोलवर चालणार्‍या ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली. हे काम वेळेपूर्वी होण्यासाठी ट्रॉलीच्या माध्यमातून ओएचई तसेच रोलिंग स्टॉकची चमू परीक्षणासाठी गुंतलेली आहे. महा मेट्रोचे जवळ जवळ ७५ टक्के कागदी कार्य पूर्ण झालेले आहे.
ट्रायल रन अंतर्गत येणार्‍या मेट्रो स्थानकांचे कार्य ७० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेले आहे. सिग्नल तथा दूरसंचारचे कार्य देखील वेगाने पूर्ण केले जात आहे. आरडीएसओची चमू सर्व तांत्रिक बाबी सोबतच रोलिंग स्टॉक सिग्नल तसेच दूरसंचार, ओएचई आणि पीएस, सिग्नल तसेच दूरसंचार कार्याचे निरीक्षण करेल. आरडीएसओची हिरवी झेंडी मिळाल्यावर आणि कमिश्‍नर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीमार्फत केल्या जाणार्‍या परीक्षणानंतरच मेट्रो रेल्वेच्या कमर्शियल संचालनासाठी परवानगी प्रदान केली जाईल.
महा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य २४/ ७ च्या वेगाने केले जात आहे. येणार्‍या जुर्ले २०१८ वर्षाच्या मध्यंतरी सीताबर्डी पर्यंत मेट्रो ट्रेन संचालित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या कार्याच्या पूर्ततेसाठी मेट्रोची चमू दिवस रात्र जुंपलेली आहे. या वर्षाअखेर खापरी ते न्यू एयरपोर्टच्या मध्ये कमर्शियल पद्धतीने मेट्रोचे संचालन होऊ शकेल व कार्यासोबतच नागरिकांना मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा आनंद मिळू शकेल.