तीन दिवसीय हकदर्शक साथीचे प्रशिक्षण संपन्न

0
24

गोंदिया,दि.८ : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गोंदिया व हकदर्शक इम्पावरमेंट सोल्युशन प्रा.लि.यांच्या संयुक्त वतीने तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत हकदर्शक साथी प्रशिक्षणाचे उदघाटन ६ सप्टेबर रोजी अग्रसेन भवन येथे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, प्रशिक्षक जयेश चौधरी, प्राजक्ता देशमुख, माविमचे सहायक सनियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्रत्येकी चार हकदर्शक साथी अशा एकूण २८ साथी सहभागी झाल्या आहेत. प्रधानमंत्री यांच्या डिजीटल इंडियाच्या धर्तीवर ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माहितीचा स्त्रोत म्हणून जिल्ह्यातील गावोगावी जावून शासकीय योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांना मिळावी यासाठी हे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणाचे अत्यंत चांगल्या प्रकारचे काम सुरु असल्याची प्रसंशा करुन श्री.खडसे यांनी हकदर्शक साथीच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरीब गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
श्री.सोसे यांनी प्रशिक्षणामागची भूमिका विशद केली. प्रशिक्षक म्हणून लाभलेले जयंत चौधरी व प्राजक्ता देशमुख यांनी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणात उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रदिप कुकडकर यांनी काम पाहिले.