नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान तर्फे उत्कृष्ठ काम करणारे वन कर्मचारी सन्मानीत

0
26

गोंदिया,दि.१४ : नवेगावबांध येथील अरण्य वाचन सभागृहात नुकतेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संरक्षणाची जबाबदारी खांदयावर घेवून वनांचे रक्षण करणारे वनपाल व वनरक्षकांना सन्मानीत करण्यात येवून त्यांना नवीन कामे करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आली.
मुख्य अतिथी म्हणून मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) संजीव गौड यांची तर नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ.रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक एस.युवराज, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक अमलेंदू पाठक, विभागीय वन अधिकारी गीता पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी व्याघ्र प्रकल्पातील अविरत सेवा देवून उत्कृष्ट काम करणारे, उत्कृष्ट कर्मचारी, सर्वसाधारण उत्कृष्ट महिला कर्मचारी, सेल्फी फॉर टायगर, वनसंरक्षणाच्या दृष्टीने तसेच विशेष व्याघ्र संरक्षण दलात प्रभावी व उत्कृष्ट काम करणाऱ्या वनपाल व वनसंरक्षकांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षिस व सन्मानपत्र देवून मुख्य वनसंरक्षक श्री.गौड यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. त्यामध्ये २५ वनपाल/वनसंरक्षक व २ महिला वनरक्षकांचा समावेश आहे. एक नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत जननी कल्याण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना सन २०१६-१७ या वर्षात मुलगी अपत्य म्हणून प्राप्त झाली आहे त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयाचा पहिला हप्ता यावेळी देण्यात आला. १० वी व १२ वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या चार पाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षिसे देण्यात आले.महिला सशक्तीकरणाअंतर्गत महिलांना योग्य सन्मान व पुरस्कार देण्यासाठी राज्यात केवळ नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाअंतर्गत जननी कल्याण योजना कार्यान्वीत केल्याची माहिती श्री.गोवेकर यांनी प्रास्ताविकातून दिली. उपस्थितांचे आभार अमलेंदू पाठक यांनी मानले.