डॉ.विकास भाले पीकेव्हीचे नवे कूलगुरू

0
8

मुंबई,दि. २३:-डॉ. विलास भाले यांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शनिवारी (दि. २३) डॉ. विलास मधुकरराव भाले यांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली.डॉ. विलास भाले सध्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

डॉ. विलास भाले (जन्म दि. ५ सप्टेंबर १९५७) यांनी सन १९९२ साली गांधी कृषि विज्ञान केंद्र (जीकेव्हीके), बंगलोर येथून अॅग्रोनोमी या विषयात पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन आणि कृषि विस्तार शिक्षण क्षेत्रात एकूण ३७ वर्षांचा अनुभव आहे.डॉ. विलास भाले यांनी १३ पुस्तके लिहिली असून त्यांची २७ संशोधन प्रकाशने प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. भाले इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रोनोमी या संस्थेचे फेलो असून त्यांना ‘डॉ. अब्दुल कलाम जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ उमेदवारांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे.

डॉ. रवीप्रकाश दाणी यांच्या कुलगुरुपदाच्या सेवा दिनांक २९ जुलै २०१७ रोजी संपुष्टात आल्यामुळे हे पद रिक्त होते.नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश न्या. हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली होती. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. विलास भाले यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहिर केली.