वीज पडून १५ जनावरे ठार; चार प्रवासी जखमी

0
13

गडचिरोली,दि.01 – जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे धानोरा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या दुधमाळा जंगल परिसरात वीज पडल्याने ३ जनावरे जागीच ठार तर तालुक्यातील गट्टा येथील जंगल परिसरात जनावरांच्या कळपावर वीज पडून तब्बल १२ जनावरे ठार झाली. तसेच तिसºया घटनेत दुधमाळा येथील बसथांब्याजवळ असलेल्या एका झाडावर वीज कोसळल्याने चार प्रवासी जखमी झाल्याची घटना आज (दि. १) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.  चार प्रवाशांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. संपत जुमनाके, बंडू वाढई (३६), दिलीप बोलीवार अशी जखमींची तर देविदास देवाजी गुरनुले (४०) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या दुधमाळा येथील लालाजी निकुरे, अमित मेश्राम व सुरज वाढई हे गावातील गुरे घेऊन कंपार्टमेंट नं. ४६२ मध्ये चारण्यासाठी गेले होते. आज दुपारच्या सुमारास ढगाळी वातारण निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास जंगल परिसरात चरत असलेल्या जनावरांच्या कळपावर वीज कोसळल्याने कळपातील तीन जनावरे जागीच  ठार झाली.  यामध्ये एक बैल व दोन गायीचा समावेश आहे. मृत जनावरांपैकी विठ्ठल कोकोडे यांच्या मालकीचा एक बैल तर नरेश गुरनुले व देवराव आतला यांच्या मालकीची प्रत्येकी एक गाय आहे. यामध्ये तिन्ही शेतकºयांचे जवळपास ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.  तसेच दुसºया घटनेत तालुक्यातील गट्टा येथील जंगल परिसरात चरत असलेल्या जनावरांच्या कळपावर अचानक वीज कोसळल्याने तब्बल १२ जनावरे ठार झाली. यात जनावर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तर तिसºया घटनेत दुधमाळा येथील बसथांब्याजवळ दुपारच्या सुमारास जवळपास १५ प्रवासी बसची प्रतीक्षा करीत असताना बसथांब्याजवळ असलेल्या ऐनाच्या झाडावर अचानक वीज कोसळल्याने बसची प्रतीक्षा करणारे चार प्रवासी जखमी झाले. यामध्ये देविदास देवाजी गुरनुले, संपत जुमनाके, बंडू वाढई, दिलीप बोलीवार अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना माहित होताच, त्यांनी तत्काळ धानोरा ग्रामीण रूग्णालय गाठले व जखमींची विचारपूस केली.