उड्डाणपुलावरील बंद दिव्यासांठी काँग्रेसचा कॅंडल मार्च

0
13

गोंदिया,दि.04- शहराच्या दोन भागांना जोडणार्या नव्या व जुन्या उड्डाणपुलांवरील विद्युत पथदिवे गेल्या  दोन महिन्यापासून  बंद असल्याने रात्रीच्यावेळी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.त्या बाबीला हेरून काँग्रेसच्यावतीने मंगळवारच्या सायकांळी 7 वाजता येथील नेहरु चौकात कॅंडल मार्च कार्यक्रमाचे आयोजन करुन नगरपरिषद प्रशासन व बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मशाल मोर्चा काढून पुलाच्या दोन्ही कठड्यावर मशाली आणि मेणबत्या जाळण्यात आल्या.या मार्च नेतृत्व भंडारा-गोंदिया लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल यांनी केले.यावेळी नगरसेवक राकेश ठाकूर,शकील मंसुरी,अशोक चौधरी,दिपल अग्रवाल,आलोक मोहंती,भालेराव,अर्पुव अग्रवाल,देवा रुसे,भागवत मेश्राम आदी उपस्थित होते. गोंदिया शहराच्या मध्य भागातून मुंबई-हावडा रेल्वे लाईन जात असल्याने शहरातील दोन्ही टोकांना जोडण्यासाठी एका पुलाची निर्मिती तब्ब्ल ५० वर्षा आधी करण्यात आली होती. त्यानंतर आता नवीन उड्डाण पूल ४ वर्षा अगोदर तयार करण्यात आला.त्या पुलाच्या देखभालदुरुस्तीची जवाबदारी सार्वजनिक बांधकाम (रोहयो)विभागाकडे आहे.तर पुलावरील विद्युत पथदिव्यांची जवाबदारी नगरपरिषदेकडे असून मागील दोन महिन्यापासून दोन्ही पुलावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. महाविद्यालय आणि ट्युशन कलासेसला जाणार्या व रात्री उशीरापर्यंत पुलावरुण ये-जा करणार्या विद्यार्थिनीना काळोखामूळे त्रास सहन करण्याची वेळी आली आहे.