बेरोजगारांना स्वावलंबनासाठी मुद्रातून कर्ज दयावे- जिल्हाधिकारी काळे

0
11

गोंदिया, दि.११ : बेरोजगारी आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व बेरोजगारांना रोजगार देणे शक्य नाही. जो बेरोजगार गरजू व्यक्ती उद्योग/व्यवसाय सुरु करण्यास इच्छूक आहे अशांना स्वावलंबनासाठी बँकांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून कर्ज उपलब्ध करुन दयावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हास्तरीय बँकर्स समितीची सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी काळे बोलत होते. सभेला जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुद्रा बँक योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. गरजू व्यक्तीला स्वबळावर उभे करण्याचे स्वप्न प्रधानमंत्र्यांनी या योजनेतून बघितले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना मुद्रा योजनेतून गरजू व्यक्तींना कर्ज वाटप करण्याचे जे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण करावे. आर्थिकदृष्ट्या जो आधीच सक्षम आहे त्यांना या योजनेतून कर्ज देण्याचे टाळावे. गरजू व्यक्ती या योजनेची माहिती घेण्यास व कर्ज मागण्यास बँकेकडे आल्यास त्याला योग्य ते मार्गदर्शन करुन कर्ज उपलब्ध करुन दयावे.
बँकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांशी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सभ्यपणे वागावे असे सांगून श्री.काळे म्हणाले, बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करावे. समाजाचे आपल्याला काही देणं लागतं या भूमिकेतून काम करावे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही मोठी बँक असून या बँकेच्या शाखांच्या अनेक तक्रारी येत आहे. बँकेचे जिल्हा समन्वयक याकडे विशेष लक्ष देत नाही हे यावरुन दिसून येते. मुद्रा बँक योजनेत या बँकेचे काम समाधानकारक नसल्यामुळे जिल्हा अग्रणी व्यवस्थापकांनी रिझर्व्ह बँकेकडे याबाबतची माहिती दयावी. असेही श्री.काळे यांनी सांगितले.
श्री.सिल्हारे म्हणाले, मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करतांना जो व्यक्ती गरजू आणि त्यांची व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे अशांचा विचार करावा. चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात येणाऱ्या उद्दिष्टांची पुर्ती करावी. बँक ऑफ इंडियाच्या स्टार स्वरोजगार संस्थेअंतर्गत अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि देण्यात येत आहे त्यांना सुध्दा बँकेनी मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करुन दयावे. असे त्यांनी सांगितले.
श्री.खडसे म्हणाले, अनेक बेरोजगार व गरजू व्यक्ती मुद्रा योजनेतून व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी करतात. तेव्हा काही बँकेचे अधिकारी व कर्मचारी त्यांची दिशाभूल करुन त्यांची बोळवण करतात. या योजनेचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यात येत असल्यामुळे माहितीच्या आधारे कर्जाबाबत बँकांकडे विचारणा करण्यासाठी आलेल्या व्यक्तींशी बँकर्स नीट बोलत नाही. यापुढे असे प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित बँकांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
मुद्राबाबत आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स सभेला बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, युनियन बँक, आयडीबीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सीस बँक, आयसीआयसीआय बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक व बँक प्रतिनिधी उपस्थित होते.