काश्मीरच्या बांदीपोरामध्ये चकमकीत दोन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

0
15

बांदीपोरा दि.११ :- जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले पण आपले दोन जवानही शहीद झाले. चकमक संपलेली नसून, ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजूनही काही दहशतवादी इथे लपले असण्याची शक्यता आहे. ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाचे असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी बारामुल्ला येथील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला कंठस्नान घातले. खालिद हा बीएसएफ कॅम्पवर झालेल्या तळावरील हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी खालिद याला एका शाळेमध्ये घेरले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी झालेल्या चकमकीत खालिद जखमी झाला होता. पायाला जखम झाल्याने तो याच परिसरात अडकला होता. अखेर चकमकीत लष्कराने त्याला ठार मारले. खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता.