लोहार समाजाला सवलती देण्यासाठी प्रयत्न करणार : खा.पटोले

0
34

भंडारा,-आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोहार समाजाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय नियमांनुसार भटक्या जाती, जमाती ओबीसी प्रवर्गात मोडतात. लोहार समाज हा भटक्या जमातीत मोडत असला तरी राज्यात या समाजाच्या समस्या सुटलेल्या नाहीत. भटक्या जमातींना एस. सी. व एस. टी. प्रवर्गाप्रमाणे शासनाच्या सवलती मिळवून देण्याकरीता आपण प्रयत्न करीत असल्याचे मत खा. नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते शितलामाता मंदिर सभागृहात आयोजित लोहार समाजाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघाचे अध्यक्ष रा. दा. सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून महासंघाचे संस्थापक डॉ. उकेकर, आ. रामचंद्र अवसरे, महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. चरणदास बावने, एस. एन. शेंडे, आनंद बावणे, फुलचूर सतिबावणे, दिलीप पाटनकर, पालकर कोसरे यांची उपस्थिती होती. यावेळी खा. नाना पटोले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी २५ उपवर-वधूंनी आपला परिचय दिला.
प्रा.चरणदास बावने यांनी समाजबांधवाच्या समस्या विशद करताना तरूणांना रोजगार मिळणे कठीण झाले असल्याचे सांगितले. आ.अवसरे यांनी लोहार समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्‍वासनही दिले. तसेच लोहारांना नवीन उद्योगधंदे उभारण्याकरीता विशेष योजना राबऊन सवलती देण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संचालन गोपाल शेंडे यांनी तर आभार शामराव चाफेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता दशरथ बोरकर, नरेंद्र मेश्राम, गणेश मेश्राम, किशोर रामटेके, अशोक आप्तुकर, पवन पंधराम, मेश्राम यांच्यासह समाज मंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.