भंडारा जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सरपंचपदावर सरशी

0
21

भंडारा,दि.18 : गाव स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची ठरणाºया ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल मंगळवारला दुपारी घोषित झाले. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या चेहºयांवर आनंद व उत्साह दिसून आला तर पराभूत उमेदवारांच्या गोटात नाराजी दिसून आली. या निवडणुकीत काही ठिकाणी जुन्यांना नाकारले तर काही ठिकाणी नव्यांना संधी मिळाली आहे. भाजपने विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके,भंडारा नगराध्यक्ष सुनिल मेंढे,आमदार रामचंद्र अवसरे यांच्यासह विजयोत्सव साजरा केला.भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांचे पती मुरमाडी तुप येथून सरंपचपदी निवडून आले.भाजपच्या अभिनंदन जाहिराती सोशल मिडियासह वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याअसून त्यामध्ये खासदार नाना पटोलेंचा नसलेला फोटो म्हणजे भाजपशी पटोलेंचा संबध नाहीच अशाच संदेशही दिला गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
भंडारा जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतीसाठी सोमवारला ८८ टक्के मतदान झाले. यात तुमसर तालुक्यात ७७, मोहाडी तालुक्यात ५८, भंडारा तालुक्यात ३९, पवनी तालुक्यात ४५, साकोली तालुक्यात ४१, लाखनी तालुक्यात ५१ तर लाखांदूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायत साठी निवडणुका पार पडल्या.
भंडारा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात सकाळी १० वाजतापासून सुरू झाली. भंडारा तालुक्यातील लक्षवेधी गणेशपुरात गणेशपूर ग्रामविकास आघाडीचे मनिष गणवीर हे सरपंचपदी विजयी झाले. बेला येथे बालू ठवकर यांच्या नेतृत्वात सरपंचपदी पूजा ठवकर आणि आठ सदस्य विजयी झाले.
भंडारा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतपैकी २६ ठिकाणी भाजप गटाने कब्जा केला. लाखनी तालुक्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे. सरपंच थेट निवडणूक असल्याने अनेक ग्रामपंचायतवर सरपंच रुपाने काँग्रेस उमेदवारांनी सत्ता हस्तगत केली.
साकोली तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यात काँग्रेस, भाजपा, राकाँ प्रणित उमेदवारांचा विजय झाला असून विजयी उमेदवारांनी उत्साहात विजयी रॅली काढली.
लाखांदूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस समर्थित सरपंच विजयी झाले असून भाजप समर्थित २० ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करण्यात यश आले तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ ठिकाणी तर ५ ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आले.मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी मोठ्या गावांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसल्याचे चित्र आहे.