चार दिवस धावणार विशेष ट्रेन १८ ते २१ ऑक्टोबर : गोंदिया ते इतवारी

0
5

गोंदिया,दि.१८ : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्याची लोकवाहिनी असलेली एसटीची प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. दिवाळीची गर्दी सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. एसटीचा संप व दिवाळीची गर्दी पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी विशेष पुढाकार घेवून गोंदिया ते इतवारी (नागपूर) व इतवारी ते नागपूर या दरम्यान विशेष ट्रेनची व्यवस्था १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान केली आहे. या विशेष ट्रेनला ६ जनरल कोच व २ शयनयान कोच राहणार आहे. ही विशेष ट्रेन १८ तारखेला सायंकाळी ४.३० वाजता गोंदियावरुन सुटेल व इतवारीला रात्री ८.३० वाजता पोहोचेल. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १ वाजता गोंदियाला पोहचेल व गोंदिया येथून त्याचदिवशी दुपारी ४.३० वाजता निघून इतवारीला रात्री ८.३० वाजता पोहचेल. २० ऑक्टोबर रोजी इतवारी येथून सकाळी ८.३० वाजता निघून गोंदिया येथे दुपारी १ वाजता पोहचेल. त्याच दिवशी गोंदिया येथून दुपारी ४.३० वाजता निघून इतवारी येथे रात्री ८.३० वाजता पोहचेल. २१ ऑक्टोबर रोजी इतवारी येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १ वाजता पोहचणार आहे. ही विशेष ट्रेन चार दिवस निश्चित वेळी सर्वच रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. रेल्वे प्रवाशांनी या विशेष ट्रेनचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.