शेतकरी कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण पालकमंत्र्यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

0
9

गोंदिया,दि.१८ : राज्य शासनाने ३४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या ऐतिहासिक कर्जमाफी निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दिवाळीचा मुहूर्त साधल्या गेला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरणाचा राज्यस्तरीय सोहळा आज १८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला. अशाचप्रकारचे कार्यक्रम आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरण सह्याद्री अतिथीगृहात सुरु असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात उपस्थित पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे प्रामुख्याने उपस्थित होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधतांना पालकमंत्री राजकुमार बडोले मुख्यमंत्र्यांना म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आज खुप आनंदीत आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कर्जमाफी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम होत आहे. या योजनेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई येथील पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा राज्यस्तरीय सोहळा पाहण्यासाठी व मुख्यमंत्र्यांचे याबाबतचे विचार ऐकण्यासाठी माणिकलाल लिल्हारे, लखनलाल कटरे, निलवंताबाई मेश्राम, चिंटू बिसेन, मंगरु रहांगडाले व अंजनाबाई बिसेन हे पात्र शेतकरी सुध्दा यावेळी उपस्थित होते.