जैविक शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीरच

0
24

नागपूर, दि.26 :  आधुनिक पद्धतीने शेती करताना शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न व्हावे आणि जमीनीचा पोत कायम राहावा याकरिता सेंद्रीय शेती करणे अधिक लाभदायक असते. सेंद्रीय खतांचा प्राधान्याने वापर करून जैविक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असायला हवा. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्याकरिता कृषी मंत्रालय तथा कृषी सहकार विभाग, क्षेत्रीय जैविक शेती केंद्र,गौंडखैरी यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना जैविक शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वनामतीचे संचालक  पी.एन. राऊत, वायोकेअरचे डॉ. सुहास बुद्ये, दिनी केमिकल्स प्रा. लि. चे चंद्रकांत गुप्ते, गोंदियाचे रुची ॲग्रोटेकचे डॉ. महेंद्र ठाकूर, श्रीमती डॉ. विजय कुमारी, श्रीमती प्रगती गोखले, महात्मा गांधी इंस्टिट्युट फॉर रुरल इन्डस्ट्रीलाइजेशनच्या उपसंचालक श्रीमती कांचन कोतवाल,भंडारा येथील किसान सहायक संघ व स्वदेश महासंघाचे रोहन राऊत, गौंडखैरी क्षेत्रीय जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. अजय सिंह राजपूत, डॉ. तुषार काकडे, रवि उपाध्याय उपस्थित होते.

जैविक शेती करण्याकरिता मुद्रा योजना आणि अन्य शासकीय योजनांविषयी सिंडीकेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अर्चना कडू यांनी जैविक पॅकेज ऑफ प्रॅक्टीसची आवश्यकता व रोजगाराच्या दृष्टीने असे उपयुक्त आहे याविषयी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी शेतीपुरक व्यवसायाकडे वळणे अधिक फायदेशीर आहे. तसेच उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळाल्यास व्यवसायाला नवी दिशा मिळू शकेल. त्याकरिता मुद्रा योजनेतंर्गत सहकार्य करण्यात येत असल्याचे डॉ. के. पी. वासनिक यांनी यावेळी सांगितले. तसेच कौशल्य विकास अंतर्गत अधिकाधिक युवकांना रोजगार देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता अर्थसंकल्पात 17 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यशाळेत डॉ. राजपूत यांनी शेती अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सरिता यादव यांनी तर, आभार अर्जून सिंह यांनी मानले.