उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
12

नागपूर : माजी सॉलिसिटर जनरल वरिष्ठ वकील हरीश साळवे यांना मानाचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे. अ‍ॅड. हरीश साळवे नागपूरचे सुपुत्र असून त्यांचे शालेय शिक्षण एसएफएस शाळेत झाले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते एन. के. पी. साळवे त्यांचे वडील होय. आई अम्ब्रिती या व्यवसायाने डॉक्टर होत्या. सदर येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. साळवे यांनी सुरुवातीला ‘सी. ए.’चे शिक्षण घेतले होते. यानंतर ते वकिलीकडे वळले. कर विषयक कायद्यांचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला त्यांचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी १९८० मध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली. यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ते प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले आहे. ते १ नोव्हेंबर १९९९ ते ३ नोव्हेंबर २००२ पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल होते. त्यांनी माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत कार्य केले आहे. त्यांनी रिलायन्स, टाटा, व्होडाफोन आदी नामांकित उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व केले आहे. हरीश साळवे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे शहरातील वकिलांनी आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी हा नागपूरचा सन्मान असल्याचे सांगितले.

पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करून शासनाने त्यांचा योग्य सन्मान केला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.