कीटकनाशकाची फवारणी करताना शेतमजुराचा मृत्यू

0
16

गडचिरोली, दि.२: कीडीचा नायनाट करण्यासाठी कपाशीच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊन एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना (दि.१) चामोर्शी तालुक्यातील गणपूर(रै)येथे घडली. दिनेश गणपती ख्ररबनकार (३४) असे  मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुली व १ मुलगा आहे.दिनेश खरबनकार हा काल गणपूर रै येथील संजय मुलकलवार यांच्या शेतात कपाशीच्या पिकावर कीटकश्नाशकाची फवारणी करण्याकरिता गेला होता. फवारणी करीत असताना विषबाधा झाल्याने भोवळ येऊन तो खाली कोसळला. जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गेल्या तीन-चार वर्षांपासून चामोर्शी तालुक्यात कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ओळीने कपाशीची लागवड केली आहे. मात्र, कपाशीची आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ झाल्याने कपाशीच्या दोन ओळींमध्ये शिरकाव करण्यास जागाच उरली नसून, ही दाट जागा रसशोषक कीडे व बोंड अळ्यांना पोषक ठरत आहे. या अळ्यांचा नायनाट करण्याकरिता शेतकरी जहाल कीटकनाशकांची फवारणी करु लागले आहेत. परिणामी फवारणी करणाऱ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मजुराचा मृत्यू झाल्याची जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी देसाईगंज तालुक्यातील एका मजुराचा मृत्यू झाला होता, हे येथे उल्लेखनीय. दरम्यान, मृत दिनेश खरबनकार याच्या कुटुंबीयांना शासनाने भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी आ.डॉ.देवराव होळी यांनी केली आहे.