जलयुक्त शिवार अभियानातूनच समृद्ध महाराष्ट्राची निर्मिती -जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे

0
10

वर्धा,दि.09 : समृद्ध महाराष्ट्र उभा करायचा असेल तर जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.वर्धा येथील विकास भवन येथे प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार कार्यक्रमात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व ग्रामपंचायतींना बक्षिस वितरण सोहळयात ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार समीर कुणावार, आमदार आशिष देशमुख, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त अनूपकुमार, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
प्रा.शिंदे म्हणाले की, मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य टंचाई मुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर विभागात यावर्षी 70 टक्के पर्जन्यमान झाले असून विभागात निश्चितच टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही. यासाठी जलयुक्त शिवाराचे महत्व सर्वांना पटवून देणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी यशोगाथा, माहितीपट तयार करुन त्यांची प्रचार व प्रसिद्धी करावी.
यावेळी जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी, पत्रकार गावांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्रथम गावस्तरीय गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मुत्तापूर गावाला रुपये 7 लाख 50 हजार व स्मृतीचिन्ह, व्दितीय गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी गावाला रुपये 5 लाख व स्मृतीचिन्ह, तालुकास्तरीय प्रथम नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका रुपये 10 लाख व स्मृतीचिन्ह, व्दितीय चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर रुपये 7 लाख 50 हजार स्मृतीचिन्ह व जिल्हास्तरीय प्रथम नागपूर 15 लाख रुपये व स्मृतीचिन्ह, व्दितीय गोंदिया जिल्हा रुपये 10 लाख व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच तालुकास्तरावर प्रथम 5 लाख रुपये व व्दितीय 3 लाख रुपयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार आशिष देशमुख, आमदार समीर कुणावार यांची समायोचित भाषणे झाली.