आता गोंदियात शोधावे लागतात खड्ड्यात रस्ते…!

0
12

गोंदिया,१७- गेल्या १८ वर्षापूर्वी गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. जिल्हा मुख्यालय आणि गत अनेक दशकापासून व्यापारनगरी अशी गोंदिया शहराची असलेली ओळख. असे असताना गोंदिया शहर अद्यापही कायम विकासाच्या प्रतीक्षेतच आहे. गोंदियाच्या विकासाची प्रतीक्षा संपणार तरी कधी? असा सवाल गोंदियाकरांच्या मनात आहे. गोंदियाला सुंदर शहर बनविण्याचे आश्वासन सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तोंडावर देत असतात. पण सत्तेवर येताच गोंदिया शहराला एखाद्या परितक्तेप्रमाणे पुन्हा कायम अपेक्षित ठेवले जाते. आता तर गोंदियाच्या रस्त्यावरून चालताना सुद्धा मनात धाकधूक असते. कधी काय होईल, याविषयी नागरिकांच्या मनात कायम साशंकता असते. आता तर रस्त्यात खड्डे नाही तर खड्ड्यात रस्ते शोधावे लागत आहेत. कधी नव्हे तेवढी रस्त्यांची वाईट अवस्था गेल्या दोन वर्षात झाली, ही खरी शोकांतिका आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला १८ वर्षा काळ लोटला आहे. असे असूनही जिल्ह्याचे मुख्यालय असलेले आणि व्यापारनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया शहराच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलविण्यात मात्र एकाही लोकप्रतिनिधीला जमले नाही. गेल्या दोन वर्षांत या शहरातील रस्त्यांची एवढी दुरवस्था झाली की कुणी अधिकारी वा लोकप्रतिनिधी सुद्धा याविषयी बोलायला तयार नाहीत. शहरातील व शहराच्या बाहेरून जाणाèया रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत,हे शोधायची वेळ आलेली आहे. एकीकडे राज्याचे बांधकाम मंत्री १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त रस्ते करण्याचा निर्धार करतात, तर दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांपासून गोंदियावासी चांगलेच त्रासले आहेत. पालिकेच्या क्षेत्रात येत असलेल्या रस्त्यांचीही पूर्ण वाताहत झालेली आहे. सिव्हिल लाईनमधील रस्ते असो की जयस्तंभ चौकाकडून मुर्रीकडे जाणारे,कुडवा नाक्यापासून पालचौकाकडे व बालाघाट रिंंगरोडकडून तिरोडाकडे जाणाèया रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडले की अधिकाèयांना अनेकदा निवेदने सादर करूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. गोंदिया शहरातील रस्तेच खड्डेमय झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, नगरपालिका व बांधकाम विभाग आपल्या गुर्मित वावरत आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळ्यानंतर रस्ते बुजविण्याचे काम विभागाकडून केले जाते. परंतु, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने रस्त्यांची स्थितीत कवडीची सुधारणा होत नाही. आता तर रस्त्यावरील खड्डे हे जीवघेणे ठरत असल्याचा रोष जिल्हावासीयांकडून व्यक्त केला जात आहे.