वाशिम जिल्ह्यात केवळ ७६३ शेततळी पूर्ण !

0
11

वाशिम ,दि.17 : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा चांगलाच आटापिटा सुरू आहे. शेततळ्यासाठी मिळणाºया अनुदानाच्या तुलनेत दुप्पट खर्च लागत असल्याने या योजनेला शेतकºयांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. दीड वर्षांत १९००  पैकी केवळ ७६३ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी, तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच उत्पादनावर विपरित परिणाम जाणवतो. शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली.
या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी प्रारंभी १८०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. नंतर त्यात वाढ करून १९०० शेततळ्यांचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. तथापि, वाशिम जिल्ह्याचा भूस्तर समान नसून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवघ्या पाच फुट खोलवरच खडक लागतो. त्यामुळे शेतकºयांना निर्धारित अनुदानात शेततळ्यांचे खोदकाम करणे शक्य होत नाही. शासनाने शेततळ्यासाठी ५० हजार रुपये आर्थिक अनुदानाची मर्यादा घालून दिली असताना अनेक शेतकºयांना या रकमेपेक्षा दुपटीहून अधिक खर्च करून शेततळे तयार करावे लागले. या मुख्य कारणामुळेच अनेक शेतकरी योजनेचा फायदा घेण्यास उत्सूक नसल्याचे दिसून येते. याशिवाय शेतकºयांना योजनेतंर्गत खोदकामाच्या नंतर अनुदान प्राप्त होते. त्यामुळे अनेक शेतकºयांची इच्छा असताना आणि जमीन शेततळ्यासाठी योग्य असताना पैशाअभावी त्यांना याचा फायदा होत नसल्याचेही वास्तव आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७६३ शेततळी पूर्ण झाली आहेत.