शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदारांना दिली रोगग्रस्त धानाची पेंढी

0
17

चंद्रपूर,दि.17 : धानपिकावर यावर्षी मावा-तुडतुडा, लाल्या यासारख्या रोगांनी आक्रमण केले आहे. पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. वारंवार मागणी करूनही शासकीय यंत्रणेमार्फत सर्व्हेक्षण सुरू झालेले नाही. धानपिकाचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क अप्पर तहसीलदार विक्रम राजपुत यांना रोगाने ग्रस्त धानाची पेंढी भेट दिली.
तळोधी भागातील शेतकरी वर्ग गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाच्या छायेत जगत आहे. यावर्षीसुद्धा कमी पावसामुळे व नंतर रोगांनी केलेल्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिसकावला जात आहे. मावा-तुडतुडा, लाल्या यासारख्या रोगांमुळे पीक उद्ध्वस्त होत असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघण्याचे चिन्ह नाही. एकरी दोन ते पाच पोते उत्पादन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीज बिल पृूर्णपणे माफ करण्यात यावे, धानाला कमीतकमी तीन हजार रु. प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, धानपिकाचे सर्व्हेक्षण करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीचे निवेदन तळोधी (बा.) व सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रोगग्रस्त धानाची पेंढी अप्पर तहसीलदारांना देत सादर केले. यावेळी जि.प.सदस्य खोजराम मस्कोल्हे जि.प. सदस्य नैना गेडाम, श्रीराम बोरकर उपस्थित होते.