रस्तेमुक्तीसाठी कालबद्ध कामे करा, दैनंदिन अहवाल पाठवा- मंत्री पाटील यांचे निर्देश

0
9
नागपूर,दि.19 : ग्रामीण व शहरी भागातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डयामुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच संपूर्ण रस्ते 15 डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्त करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करुन त्याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्यात.राजीव गांधी बौद्धीक संपदा संस्थेच्या सभागृहात नागपूर विभागातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
जनतेला दळणवळणासाठी चांगले रस्ते देण्याच्या योजनेअंतर्गत खड्डेमुक्त रस्ते हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत असल्याचे सांगताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, सर्व कामे अतिशय गुणवत्तापूर्ण व नियोजित कालावधीत पूर्ण करण्यात यावीत. दिनांक 15 डिसेंबरपूर्वी आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के खड्डेमुक्त रस्ते करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल.
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रस्ते बांधकामासह सर्वच विकास कामांमध्ये आधुनिक तंत्राचा वापराची कार्यप्रणाली स्वीकारण्यात आली आहे. ही प्रणाली सर्वच ठिकाणी तसेच अधिक कार्यक्षमपणे वापरण्याबाबत अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व ही प्रणाली कशी वृध्दीगंत करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील अधिकाऱ्यांना आवाहन केले.
खड्डेमुक्त रस्त्यांचा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर आढावा घेण्यात येत असून क्षेत्रिय अधिकाऱ्यांसोबत अधिक समन्वयाने या कामाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना श्री. पाटील म्हणाले की, खड्डे भरण्यासंबंधीचा दैनंदिन अहवाल मंत्रालयात सादर करावा व ही सर्व कामे अतिशय गुणवत्तापूर्ण व नियोजित कालावधीत करण्याबाबत विभागातील अधिकाऱ्यांनाही मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर प्रादेशिक विभागातील विविध कामांचा आढावा घेऊन दैनंदिन येणाऱ्या अडचणी संदर्भातही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बांधकामा संदर्भात असलेले उद्दिष्ट दिलेल्या कालावधीत पूर्ण करावे, अशा सूचनाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्यात. प्रारंभी नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी विभागातील खड्डेमुक्त रस्त्यांच्या कामासंदर्भात केलेल्या नियोजनबध्द आराखड्याची माहिती दिली. अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी नागपूर सर्कलमध्ये सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर, मिलिंद बांधवकर, जनार्दन भानुसे आदींनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्या संदर्भात सुरु असलेल्या कामाबाबतचा अहवाल सादर केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव फू.स. मेश्राम उपस्थित होते.