नागपूर,दि.24ः-उपराजधानीच्या गुलाबी थंडीत राजकीय पारा वाढविणारे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची पुढील महिन्याच्या ११ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार शहरात डेरेदाखल होणार असल्यामुळे आगमनाच्या तयारींना वेग आला आहे. विधानभवनासह आमदार निवास, रविभवनातील इमारतींची रंगरंगोटी व किरकोळ डागडुजीची कामे सुरू असून, आमदार निवास १ कोटी ७५ लाख तर रविभवन, नागभवनाच्या रंगरंगोटीवर २ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 15 दिवसासाठी कोट्यावधीचा रंगरंगोटीवरील खर्च हा फक्त गैरकारभारासाठीच म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
विदर्भाच्या मुद्यांना न्याय मिळावा, येथील विकासकामांना गती मिळावी, बॅकलॉग भरून निघावा आदींकरिता नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. महिन्याभरापूर्वीपासूनच तयारी सुरू असते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रविभभवन, नागभवन, हैद्राबाद हाऊस यासह अन्य शासकीय निवास्थानांची डागडुजी, रंगरंगोटी केली जाते. त्यानुसार विधानभवनाची रंगरंगोटी व डागडुजीची कामे सुरू आहेत. रविभवन येथे मंत्र्यांच्या राहण्याची व्यवस्था असते. रविभवन, नागभवन, हैदराबाद येथील प्लबिंग आणि रंगरंगोटीच्या कामासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही सर्व कामे ३0 नोव्हेंबरपयर्ंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार निवासाची कामे खासगी कंत्राटदारांमार्फत करण्यात येत असून, या कामांवर १ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
रविभवनात ८५ कक्ष असून ३0 कॉटेजेस आहे. हे मंत्र्यांचे बंगले आहेत. तर राज्यमंत्र्यांची व्यवस्था नागभवन येथे केली जाते. नागभवनात १६ कॉटेजेस आहेत. रविभवनाच्या परिसरात असणारा देवगिरी हा बंगला उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव असतो. रामगिरी हा बंगला मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान आहे. रविभवनातील साफसफाई आणि देखभालीचे काम खासगी एजन्सीकडे सोपविण्यात आले असून, त्यावर वर्षाला १२ लाखांचा खर्च होतो.
आमदार निवासात आमदारांच्या निवासाची सोय असते. यातील विंग-१ मध्ये १३२ खोल्या, विंग-२ मध्ये १८३, तर विंग-३ मध्ये ७१ खोल्या आहेत. १६ खोल्यांची एक स्वतंत्र बिल्डिंगही आमदार निवास परिसरात आहे. अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी व विधानभवनात होणार्या अभ्यासवगार्ना उपस्थित राहण्यासाठी बाहेरून येणार्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय येथे केली जाते.





