उत्पादकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे-जिल्हाधिकारी

0
15

भंडारा,दि.27 : जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय वाढीकरिता दूध उत्पादकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे, जेणेकरून तीन मातेचे ऋण फेडण्याची संधी मिळेल असे प्रतिपादन राष्ट्रीय डेअरी विकास बोडार्चे कार्यपालन निदेशक संग्रामसिंग चौधरी यांनी केले. भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघद्वारे आयोजित राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड अंतर्गत डेअरी सहकारिता जागृती अभियान, किसान मार्गदर्शन सोहळा, किसान दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याकरिता किसान शॉपीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सुहास दिवसे होते.
संग्रामसिंग चौधरी म्हणाले की, एक जन्म देणारी, दुसरी अन्नधान्य उत्पन्न देणारी धरतीमाता तर तिसरी दूध उत्पादन देणारी गाय व म्हैस या तिन्ही मातांचा सन्मान केल्यास जीवनामध्ये सुखसमृध्दी आल्याशिवाय राहणार नाही. बनासकाटा जिल्हा दूध उत्पादक संघाचे उदाहरण देताना सांगितले की, दूध संघावर कार्यकारी संचालक म्हणून कामाची सुरुवात केली. त्यावेळी एक हजार लिटर दूधाचा संकलन होता. आज रोजी प्रती दिवस ५५ लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. बनास डेअरी पालनपूर (गुजरात) या नावाने भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक संस्था आहे. भंडारा जिल्ह्यात नैसर्गिक उपलब्धता दुग्ध व्यवसायासाठी असल्याने जिल्ह्यात दुग्ध उत्पादनास मोठा वाव आहे. याकरिता जीवनात मोठे बनण्याकरिता उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले, जिल्ह्यातील सद्यस्थितीत शेती व्यवसायामधून घेत असलेल्या उत्पादनात काही प्रमाणात बदल करून वेगवेगळी उत्पादने घेतल्यास शेतकठयांच्या आर्थिक स्थितीत बदल होईल. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय अंगिकारल्यास आमूलाग्र बदल होईल. व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे (पश्चिम क्षेत्रीय) प्रमुख अनिल हातेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भंडारा दुग्धसंघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी प्रास्ताविक भाषणातून संघाचे कार्य विषद करून उपस्थितांना भंडारा दुग्ध संघास जास्तीत जास्त दूध पुरवठा करावा असे आवाहन केले. या शुभप्रसंगी जि.प.भंडारा मुख्य कार्यपालन अधिकारी मनोज सुर्यवंशी, प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी हेमंत गडवे, वसुंधरा डेअरी (अमूल) मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम लढ्ढा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. फुके, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, जि.प.सदस्य प्रभू मोहतुरे, पं.स.सदस्य यादोराव कापगते, माजी संचालिका छाया पटले, देशमुख व रोहन जैन अमूल मार्केटींग, महेश दुरबुडे व संघाचे संचालकगण विनायक बुरडे, सदाशिव वलथरे, महेंद्र गडकरी, नरेश धुर्वे, आशिष पातरे, राम गाजीमवार, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवणकर, रिता हलमारे, अनिता साठवणे मंचावर उपस्थित होते.
संचालन संघाचे करण रामटेके व आभार संतोष शिवणकर यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील बहुसंख्येने दुग्ध उत्पादक व नागरिकांची उपस्थिती होती.