ओबीसींनी गुलामगिरीत ठेवणारी ब्राम्हणी व्यवस्था नाकारावी-अमोल मिटकरी

0
25

गडचिरोली, दि.२८ः: तुकोबारायापासून ते शिवाजी महाराज, म.फुले व डॉ.आंबेडकरांपर्यंत आणि अगदी अलिकडच्या काळातसुद्धा ब्राम्हणी व्यवस्थेने ओबीसींना गुलाम बनविण्याचे काम केले. त्या व्यवस्थेत ओबीसींचा उद्धार होणे शक्य नाही. त्यामुळे आता ओबीसींसह सर्वच बहुजनांनी गुलामगिरीत ठेवणारी ब्राम्हणी व्यवस्था नाकारावी, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अमोलदादा मिटकरी यांनी आज येथे केले.

जिल्हा माळी समाज संघटनेच्या वतीने अभिनव लॉन येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. माळी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक शंकरराव लिंगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे, दिलिप कोटरंगे, पुरुषोत्तम निकोडे मंचावर उपस्थित होते.

अमोलदादा मिटकरी पुढे म्हणाले, तुकाराम महाराजांनी ब्राम्हणी व्यवस्थेवर आसूड ओढले, तर महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला. ब्राम्हणी व्यवस्थेने छत्रपती शिवरायांना गो ब्राम्हण प्रतिपालक ठरविले, तर म.फुल्यांनी शिवरायांना कुळवाडीभूषण म्हटले. शिवरायांची समाधी ज्योतिबांनीच पहिल्यांदा शोधून काढली. छत्रपतींवर पहिला पोवाडा म.फुल्यांनीच लिहिला. मात्र, येथील व्यवस्था शिवशाहीर म्हणून भलत्याच लोकांचा उदोउदो करीत आहे.श्री.मिटकरी म्हणाले की, म.फुले आणि सावित्रीबाईंनी पहिल्यांदा मुलींची शाळा काढली. नंतर त्यांनी अनेक शाळा काढल्या. स्वत: दगड, शेणाचा मारा सहन करुन त्यांनी मुलींना शिकविल्याने आज बहुजन समाजातील स्त्रिया शिकून मोठ्या झाल्या. उच्चवर्णीय महिलांनाही शिकायला मिळाले ते फुले दाम्पत्यामुळेच. त्यामुळे फुल्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा व्हायला पाहिजे. परंतु येथील व्यवस्थेने तो होऊ दिला नाही. कधी मराठी भाषेच्या नावावर, तर कधी धर्माच्या नावावर बहुजनांना मुर्ख बनविण्याचे काम केले जात आहे. आपली ताकद कुणासाठी खर्च करावी, याचे भान ओबीसींनी ठेवले पाहिजे. त्यासाठी शिक्षण घेऊन त्याचा उपयोग समाजकल्याणासाठी करावा, असे आवाहनही श्री.मिटकरी यांनी केले. यावेळी मिटकरी यांनी रामायण, महाभारत व मनुस्मृतीतील अनेक श्लोक उद्धृत करुन ब्राम्हणी व्यवस्थेवर आसूड ओढले.

शंकरराव लिंगे म्हणाले की, म.फुले विचारवंत आणि क्रांतिकारक होतेच. शिवाय ते मोठे उद्योजक होते. मुंबई व अन्य ठिकाणी त्यांनी अप्रतिम इमारती बांधल्या, धरण बांधले. परंतु संपत्ती समाज परिवर्तनासाठी वापरली. आपले कूळ हे गौतम बुद्ध आणि सम्राट अशोकाशी जुळते असल्याने आता माळी समाजाने परिवर्तनाची कास धरावी, असे आवाहन श्री.लिंगे यांनी केले. म.फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे तसेच त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणीही लिंगे यांनी केली.डॉ.अभिलाषा गावतुरे म्हणाल्या की, माळी समाजाने शिक्षण घेतले पाहिजे. कोणते विचार आपल्यासाठी हितकारक आहेत, ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. सत्यनारायण, वटवृक्षाला साकडे घालणे, व्रतवैकल्य करणे, नवस करणे, यासारख्या अनिष्ट प्रथा तत्काळ बंद केल्या पाहिजेत. फुले दाम्पत्यामुळेच आज संपूर्ण बहुजन समाज मोठा झाला. त्यामुळे म.फुल्यांचे विचार अंगिकारुन मनुवादी व्यवस्थेला झिडकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.या कार्यक्रमाला गडचिरोलीसह विदर्भातील विविध जिल्ह्यातून सुमारे १० हजार समाजबांधव उपस्थित होते. त्यामुळे आजच्या कार्यक्रमातून माळी समाज परिवर्तनाची वाट धरु लागला, हे दिसून आले.