सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेचे नाही तर समाज परिवर्तनाचे काम केले

0
19

गडचिरोली दि.२८ः- सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनात समाज सुधारणेचे नाही तर समाज परिवर्तनाचे काम केले आहे, असे प्रतिपादन चंद्रपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले.

जिल्हा माळी समाज संघटना व सर्व सामाजिक संघटना गडचिरोलीच्या सहकार्याने राष्टÑपितामह तात्यासाहेब जोतीराव फुले यांचा स्मृतिदिनानिमित्त आज २८ नोव्हेंबर रोजी शिक्षक दिन व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माळी समाज सेवा संघ यवतमाळचे संस्थापक दिलीप कोटरंगे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेडचे महाराष्टÑ राज्य संघटक अमोल मिटकरी तर विशेष अतिथी म्हणून दादाजी चापले, शेषराव येलेकर, अरूण पा. मुनघाटे, जिल्हा माळी समाज संघटनेचे अध्यक्ष स्वागताध्यक्ष पुरूषोत्तम निकोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे मार्गदर्शन करताना म्हणाले, आपल्या परिस्थितीला आड आणता, मान सन्मानाची तमा न बाळगता स्वाभिमानाला दूर सारून मानवता हा आपला धर्म मानून सर्व समाजासाठी त्यागणाºया थोर पुरूष ज्योतीबा फुले व सावित्री फुले यांनी विचारांची खाण आपल्यासाठी ठेवली. त्यांच्या विचारांची मशाल जगात अजरामर असून ती आपल्यात रूजवावी, असे प्रतिपादन लिंगे यांनी केले.
मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेडचे महाराष्टÑ राज्य संघटक अमोल मिटकरी म्हणाले, महात्मा जोतीबा फुले यांनी समाज घटकांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळे या थोर महापुरूषांचाही एक जागतिक दर्जाचा स्मारक राजधानी मुंबईत उभारला जावा, त्यासाठी आपल्या सर्व समाज घटकांनी लढा उभारला पाहिजे, असेही ते म्हणाले.
मार्गदर्शन करताना डॉ. गावतुरे पुढे म्हणाल्या, स्त्रीयांनी चूल आणि मूल याचाच विचार न करता पुरूषांच्या गुलामगिरीतच आपले जीवन व्यर्थ न घालविता या पलिकडे जाऊन प्रत्यक्षात सावित्री बनण्याचा प्रयत्न करावा.ज्योती, सावित्री या महात्म्यांच्या विचारांना आपल्या घरात स्थान द्यावे. त्यांच्या विचारांना समजून न घेतल्यानेच आज महिलांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती अडगळीत आहे. त्यामुळे आता जागृत होवून महिलांनी सर्व स्तरातून पुढे येण्याचे आवाहन डॉ. गावतुरे यांनी केले.
तत्पूर्वी सकाळी १० वाजता समाज जागृती महारॅली व प्रबोधनपर माळी जलसा ‘गाणी सावित्री – जोतीबांची’ कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविक भिमराव पात्रीकर यांनी केले. संचालन अशोक मडावी यांनी तर आभार पुरूषोत्तम लेनगुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा माळी समाज संघटना व सर्व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.