करियरसाठी स्पर्धेचे आव्हान स्विकारा- संदिप जाधव

0
30

गोंदिया,दि.१ : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर वाचनाची आवड महत्वाची आहे. स्पर्धेचे आव्हान स्विकारुन कठोर परिश्रमातून आपले जीवन उज्ज्वल करावे. असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने बजाज सभागृहात ३० नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवानिमित्ताने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा एक आव्हानङ्क या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री.जाधव बोलत होते. वक्ते म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे व स्टडी सर्कल शाखा गोंदियाचे संचालक श्याम मांडवेकर उपस्थित होते.
श्री.जाधव पुढे म्हणाले, अथक परिश्रमाशिवाय यश प्राप्त होत नाही. त्यासाठी अभ्यासाची आवड व आत्मविश्वास बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. जीवनात कुठलेही क्षेत्र हे लहान-मोठे नसते. कुठलेही क्षेत्र निवडतांना धरसोडपणा करु नये. इच्छा असेल तर मार्ग निश्चित निघतो. प्रत्येकाने आपआपल्या पध्दतीने अभ्यास करावा. ध्येय निश्चित करा, यश आपल्याला निश्चितच मिळेल असे त्यांनी सांगितले.
श्री.बरकते म्हणाले, आपल्याला काय बनायचे आहे हा उद्देश अगोदर निश्चित करुन विद्यार्थ्याने शिक्षण घ्यावे. जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर निश्चितच ध्येय पूर्ण होते. विद्यार्थ्याने कधीही हार मानू नये, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. ग्रामीण भागात ज्ञान देण्याचे काम वाचनालये करतात. वाचनालयात बरेचशी पुस्तके उपलब्ध असतात. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वाचनालयात जावून अभ्यास केला पाहिजे. आत्मविश्वास ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर निश्चितच यश आपल्या पदरात पडेल असे त्यांनी सांगितले.
श्री.कोकणे म्हणाले, आधीच्या काळात शिक्षण घेतले की नोकरी मिळत होती. आता युग बदलले आहे. हे युग स्पर्धेचे आहे. दिवसेंदिवस स्पर्धा वाढतच चालली आहे. स्पर्धेत उतरण्यासाठी अवांतर वाचन व कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. यश संपादन करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. हे युग स्पर्धेचे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तीव्रता ओळखली पाहिजे. प्रत्येकाने आपले लक्ष्य निर्धारित करुन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.मांडवेकर म्हणाले, कोणतेही आव्हान असेल तर त्याला सामोरे जाण्याचे आपल्यामध्ये सामर्थ्य असले पाहिजे. बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये नियोजनाचा अभाव असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वृत्तपत्रांचे वाचन, शासनाचे लोकराज्य मासिक, सामान्य ज्ञान पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून अभ्यास केला तर ध्येय निश्चितच साध्य करता येते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत विस्तृत माहिती दिली.
यावेळी उपस्थित काही विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत प्रश्न विचारले असता मान्यवरांनी त्यांच्या प्रश्नांचे योग्यप्रकारे निराकरण केले.
कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य विनायक अंजनकर यांनी मानले.