पुस्तके वाचण्यासारखा आनंद नाही -डॉ.हरिश्चंद्र बोरकर

0
25

गोंदिया ग्रंथोत्सवाचा समारोप
गोंदिया,दि.१ : आजचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेच्या युगात जो कठोर मेहनत घेईल तोच यशस्वी होतो. ग्रंथांमुळे जीवनाला दिशा मिळते. विविध क्षेत्राचे लिखाण आज ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. जीवन जगत असतांना माणसाला पुस्तके वाचण्यासारखा आनंद कुठेच मिळत नाही. असे प्रतिपादन झाडीबोलीचे ज्येष्ठ साहित्यीक डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी व श्री शारदा वाचलनालयाच्या वतीने आयोजित दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप शारदा वाचनालयाच्या बजाज सभागृहात ३० नोव्हेंबर रोजी झाला. यावेळी समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.बोरकर बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांची उपस्थिती होती.
डॉ.बोरकर म्हणाले, अभ्यासक्रमाची पुस्तके आणि वाचनाची पुस्तके यामध्ये फरक आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके वाचतांना ती आपण आवडीने वाचत नाही. जी पुस्तके वाचण्याची असतात ती पुस्तके वाचतांना माणसाला आनंद मिळतो. ग्रंथ वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. ग्रंथसंपदा ही माणसाच्या विकासाला चालना देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.निमगडे म्हणाले, आज माणसे वैचारीक जडणघडणीपासून दूर जात असतांना ग्रंथालयातील विचार आपल्याला दिशा देण्याचे काम करते. ग्रंथ वाचनातून माणसाचे विचार प्रगल्भ होण्यास मदत होते. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी ग्रंथ महत्वाचे आहे. नव्या पिढीने सुदृढ मनासाठी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. अनेक ग्रंथातील कथा हया प्रेरणादायी असतात. व्यक्तीमत्व घडविण्याचे कामही ग्रंथ करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.जवंजाळ म्हणाले, आपल्या बालवयापासून ते आजच्या जीवनापर्यंत ग्रंथाने काय भूमिका बजावली हे आपल्या लक्षात येईल. विविध प्रकारचे साहित्य हे व्यक्तीमत्व घडविण्यास मदत करते. करियर निवडतांना देखील ग्रंथाचा उपयोग होतो. अलिकडे ग्रंथाचे स्वरुप बदलले आहे. डिजीटल स्वरुपात ग्रंथ उपलब्ध झाले आहे. आपल्याला आवड निर्माण करणारे ग्रंथ वाचले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, श्री.रहांगडाले, श्री.चौरागडे यांचेसह अनेक पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील ग्रंथालयाचे अध्यक्ष, सचिव, ग्रंथपाल व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन विनायक अंजनकर यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.