तुमसर शहर ‘एलईडी’मय करणार

0
7

तुमसर : प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये ७0 लाखांचे एलईडी लाईट लावण्यात आले आहे. येणार्‍या काळात १00 टक्के एलईडी लाईट लावून शहर प्रकाशमय करणार असल्याचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप सिध्द झाल्यास पदाचा तात्काळ राजीनामा देण्याची ग्वाहीही कारेमोरे यांनी दिली.
पदभार ग्रहण केल्यानंतर सहा महिन्यांत केलेल्या कामाचा तपशील तथा विकासकामे झाली याची माहिती त्यांनी दिली. सध्या शहरातील १00 टक्के पथदिवे सुरु आहेत. दलित वस्तीमध्ये २ कोटी ८0 लक्ष रुपयांचे विकास कामे सुरु आहेत. नगरोत्थान अंतर्गत २ कोटी ६६ लाखांचे विकास कार्यसुरु आहेत. नगर परिषद शाळांना आवारभिंत, विनोबा नगरातील जलकुंभ परिसरात आवारभिंत घालण्यात आली. २0 रस्त्यांचे व ३८ लहान मोठ्या नाल्याचे बांधकाम सुरु आहेत. प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये एलईडी लाईट लावण्यात आले आहे.
नळांना मीटर लावण्याचे कार्य नगरोत्थान अंतर्गत कामे युध्दस्तरावर सुरु आहे. पंप नविन खरेदी करण्यात आले असून गांधी सागर तलावात ८५ लाख रुपये खर्चकरुन उद्यानात जाण्यासाठी सिमेंटीकरण रस्ता तयार झाला आहे. तुमसर नगर परिषद परिसराच्या कॉम्प्लेक्समध्ये ५ दुकानांच्या गाळ्यात दारु दुकानाना सिल ठोकण्यात आले. वाचनालयाला जास्तीत जास्त जागा उपलब्ध झाली. ४५ लाखांचा घनकचरा व्यवस्थेसाठी कालवे तयार करण्याचे काम सुरु आहे. प्रथमच टोल फ्री नंबरची व्यवस्था सुरु केली आहे. कामाचा प्रारुप तयार करणे सुरु असून त्यामध्ये १.१0 कोटींचे दलितवस्तीचे प्रस्ताव तयार करणे सुरुआहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत १.८५ कोटी रुपये, रस्ता अनुदानांतर्गत ६९ लाख उपलब्ध आहे. त्यात वाढ करुन १.0४ कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. विदर्भ वैधानिक विकास महामंडळातर्फे माकडे विद्यालय, नेहरु विद्यालयाचे बांधकाम, मालवीय प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत प्रास्तावित असून बीआरजीएस योजनेतून १.२५ कोटींच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
येत्या सहा महिन्यांत तुमसर शहरात प्रत्येक खांबावर एलईडी लाईट लावून विजेच्या येणार्‍या बिलात महिन्याकाठी १ लाख रुपयांची बचत करण्याचा प्रयत्न आहे. सर्वकामे पारदर्शक पध्दतीने व्हावी, कोठेही भ्रष्टाचार होऊ नये, याकरिता प्रयत्नशील आहे. सर्व कामाची माहिती नगर परिषदमध्ये मिळेल, असे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
यावेळी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, माजी नगरसेवक बाळा ठाकुर, बांधकाम अभियंता नागदेवे, मेहर, मानकर आदी कर्मचारी उपस्थित होते.