अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धेने घडविला जागतिक विक्रम : १४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

0
26

नागपूर,दि.6ः-  गायनापासून तर कुकिंगपर्यंतचा विक्रम नागपूरने आपल्या नावावर केले आहेत. या विक्रमात आणखी एका जागतिक विक्रमाची भर पडली आहे.बानाईतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांनी केलेल्या राष्ट्रीय कार्याबद्दल युवा पिढीत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने मागील चार वर्षांपासून प्रश्नमंजूषा स्पर्धा घेतली जात आहे. परंतु आजवर ही स्पर्धा शहरातील विविध शाळांमध्ये होत होती. एकाच ठिकाणी ही स्पर्धा कधी झाली नाही. मध्य प्रदेशात अशीच एक स्पर्धा पार पडली होती. त्यावेळी एकाचवेळी ४,९०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तेव्हा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली होती. हा विक्रम नागपुरातही होऊ शकतो, असे बानाईच्या लक्षात आले. त्यांनी या दिशेने नियोजन केले. त्यातून अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धा ही संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरुपाची होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जीवन चरित्र व कार्यावर आधारित ही स्पर्धा होती. ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व हिंदी या दोन भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. ही संपूर्ण स्पर्धा नि:शुल्क होती. जवळपास १११ शाळांमधील १४,८१५ विद्यार्थ्यांची नोंदणी आधीच झाली होती. परंतु त्यापेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी आले. जागेअभावी काही विद्यार्थ्यांना बाहेरच थांबावे लागले. १४ हजारावर विद्यार्थ्यांनी एकाचवेळी परीक्षा देऊन जुना विक्रम मोडला आणि नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली.आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक अशोक जांभुळकर यांनी संचालन केले. बानाईचे अध्यक्ष डॉ. सुनील तलवारे, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, सचिव डॉ. मनोज रामटेके, गोपाल वासनिक, प्रवीण जाधव, डॉ. विजय धाबर्डे, रवींद्र जनबंधू आदींसह बानाईची संपूर्ण टीम यावेळी कार्यरत होती.