मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मागण्या मान्य, यशवंत सिन्हांचं आंदोलन मागे

0
15

अकोला,दि.6(विशेष प्रतिनिधी)-शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी जागर मंचने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन आज (बुधवार) तिसर्‍या दिवशी मागे घेतले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती सिन्हा यांनी आंदोलकांना व पत्रकारांना दिली. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन उडीद मूग विकले असेल तर हमीभावाच्या फरकाची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याला स्थगिती देण्यात आली आहे. हमी भावानुसार उडीद मूग सोयाबीन विनाअट नाफेडद्वारे खरेदी केल्या जाईल. बोंडअळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना महिनाभरात मदत देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याचे सिन्हा यांनी सांगितले.येथील शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा आंदोलन करायला, अकोल्यात येईल, असेही सिन्हांनी सांगितले आहे.विशेष म्हणजे काल भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले येऊन मुख्यमंत्र्यांनी पीएशी बोला असा टोला लावून ते निघून गेले.परंतु आज मुख्यमंत्र्यांनी पटोलेंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत भाजपचे वरिष्ठ नेते यशंवत सिन्हा यांच्या आंदोलनाला गांभिर्यांने घे त्यांच्याशी दोनवेळा चर्चा करीत आंदोलनातील सर्वच मागण्यां मान्य केल्याने विदर्भातील खासदार पटोलेपेक्षा बाहेरील नेते माजी मंत्री सिन्हा हे वरचढ ठरल्याची चर्चा होती.

यशवंत सिन्हा यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी (बुधवार) फोनवरून चर्चा केली. मात्र, या चर्चेतून काहीही तोडगा निघाला नव्हता. चर्चा फिसकटल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री आणि सिन्हा यांनी चर्चा केली. शेतकऱ्याचा माल किती घ्यायचा हे नाफेड ठरवणार नाही. शेतकरी ठरवतील, पूर्ण शेतमाल हमी भावानेच विकत घ्यावा लागेल, या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीति मेनन व तृणमूल कांग्रेसचे खासदार त्रिवेदी यांनी यशवंत सिन्हांची भेट घेतली.दरम्यान, तुषार गांधी यांनी सिन्हा यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भारिप-बमंसचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही सिन्हांशी मोबाइलवर चर्चा करून पाठिंबा दिला होता. मंगळवारी रात्री प्रहार संघटनेचे बच्चू कडू आंदोलनात सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतमालाची नाफेडने हमीभावाने खरेदी करावी, या मागणीवरून प्रशासन आंदोलकांतील बोलणी फिसकटल्याने दुसऱ्या दिवशीही अांदाेलनाची धग कायम आहे. नाफेडतर्फे संपूर्ण शेतमाल खरेदीचा मुद्दा हा केंद्राच्या अखत्यारीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर शेतकरी जागर मंचच्या प्रतिनिधींनी हा शेतमाल पणन महासंघाने खरेदी करावा, हा प्रस्ताव ठेवला. मात्र प्रशासनाने सकारात्मकता दाखवल्यानेच ही बाेलणी फिसकटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

मुख्यमंत्र्यांशी यशवंत सिन्हा काय बोलले?

“जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी अनेकवेळा चर्चा झाली. मात्र आज 11 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. चांगली चर्चा झाली. त्यांना मी शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल सांगितले, त्यांनी फोनवरच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.”, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.

“अकोल्यातल्या आंदोलनाच्या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल. तीन दिवसांच्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी 5 हजार कोटींचा फायदा करुन घेतला.”, असे सिन्हांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सिन्हांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या?

1) बोंड अळी संदर्भात या महिन्याच्या शेवट पर्यंत सर्वेक्षण आणि पंचनामे होतील.

2) मूग, उडीद, तुरीच्या खरेदीसंदर्भात जाचक अटी दूर होणार, शेतकऱ्यांकडे हे धान्य जेवढ्या प्रमाणात असेल, तेवढी खरेदी नाफेड करेल.

3) भावांतरची मागणी मंजूर, शेतकऱ्यांनी जर हमी भावापेक्षा कमी दरात विकले असेल, तर त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1250 रुपये फरक रक्कम मिळेल, मात्र याला काही अटी आहेत.

4) कर्जमाफी रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांना 15 जानेवरीपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.

5) प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही.

6) सोने तारण कर्जाबद्दल शेतकऱ्यांची मागणीही पूर्ण झाली.

यशवंत सिन्हांच्या मागण्या काय होत्या?

1) संपूर्ण शेतमालाची नाफेडनं किमान आधारभूत मूल्यानं खरेदी करावी. यासंदर्भात केंद्राकडून काही समस्या असल्यास तो शेतमाल हमीभावानं थरेदी करण्याची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी.

2) राज्यातील कपाशीवर आलेल्या बोंडअळीग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करावे, प्रति एकरी 50 हजारांची मदत द्यावी.

3) मूग-उडीद-कापूस-सोयाबीन या पिकांसाठी शासकीय खरेदी किंवा व्यापार्यांना विकला असेल त्याकरीता भावांतराची योजना जाहीर करून त्याचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना द्यावा.

4) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा.

5 : कृषीपंपाची वीजबील मागे घेऊन वीज तोडणी मोहीम बंद करावी.

6) सोनेतारण कर्जमाफीतील जाचक अटी दूर करून त्याचा विनाविलंब शेतकऱ्यांना लाभ द्या.