एमआयडीसीतील राखेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

0
12
गोंदिया दि. 11 : : तालुक्यातील मुंडीपार एमआयडीसीमधील पॉवर प्लँटमधील राखेमुळे जवळील फत्तेपूर येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी तसेच प्रदुषन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी फत्तेपूर येथील नागरिकांनी केली आहे.
मुंडीपार एमआयडीसीजवळच फत्तेपूर गाव आहे. त्यामुळे एमआयडीसीतील पॉवर प्लॉंटमधील राख हवेमार्फत गाव व परिसरातील झाडे, पिकांसह घरावर साचून राहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या समस्येचा सामना फत्तेपूरवासी करीत आहेत. यासंदर्भात संबंधितांना माहिती देवूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे, प्रकल्पातून निघणारी राखेचे इतरत्र निर्मुलन करणे गरजेचे आहे. परंतु, केवळ वाहतुकीचा खर्च वाचविण्याच्या उद्देशानेच प्रकल्पातील राख रात्रीच्या वेळी कमी उंचीच्या बायलरव्दारे हवेत सोडली जाते. परिणामी ती राख परिसरातच खाली जावून बसते. गेल्या काही महिन्यापासून गावात राख पसरण्याचे प्रमाण वाढले आहे. ही राख शेतातील पिकांवर साचून राहत असल्याने पिक व नागरिकांच्या घरात पसरत असल्याने खाद्यान्न, पिण्याचे पाण्यातही राखेचा समावेश होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच दिवसा हवेत राखेचे प्रमाण राहत असल्याने नागरिकांना डोळे व स्वसनजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले व वृद्धांना सहन करावा लागत आहे. गावासमोरूनच गोंदिया-तिरोडा हा मुख्यमार्ग गेला असताना या परिसरातून ये-जा करणाºया वाहनचालकांनाही या राखेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रसंगी राख डोळ्यात जात असल्यानेच मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे पिकांवर राख साचून राहत असल्याने शेतकºयांना उत्पादन घेणे कइीण जात आहे. तर दुसरीकडे राखेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरदिवशी ही समस्या गंभीर होत चालली आहे. परंतु, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. राखेमुळे फत्तेपूर येथे गंभीर समस्या निर्माण होण्यापूर्वी जिल्हाधिकारी व प्रदुषन विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेवून कारवाई करावी, अशी मागणी फत्तेपूरवासीयांनी केली आहे.