काँग्रेस, भाजप दोघेही दलितविरोधी-मायावती

0
4

नागपूर,दि. 11 : काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दलितविरोधी आहेत. भाजपची सरकार आरएसएसचा हिंदुत्ववादी व जातीयवादी एजेंडा राबवित आहेत. केंद्रीताल मोदी सरकारकडून विरोधी पक्षच संपविण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी सीबीआय, आटी, ईडी सारख्या यंत्रणांचा गैरवापर होत आहे. त्यामुळेच त्यांची सत्ता आल्यानंतर दलित, आदिवासी, मुस्लीम, गरीब व एकूणच मागासवगीर्यांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत, असा जाहीर आरोप बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी केला.
बसपाच्यावतीने रविवारी महाराष्ट्रासह आंध्रपदेश- तेलंगाणा व कर्नाटक येथील कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने मायावती यांना सोन्याचा मुकुट, चांदीचा हत्ती व तलवार भेट देण्यात आली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार, राष्ट्रीय महासचिव सतीशचंद्र मिश्रा, प्रदेश प्रभारी खा. वीरसिंग, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आदी उपस्थित होते.
मायावती म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक संधी दिली होती. तशीच संधी आपण सुद्धा देत आहोत. यानंतरही दलित समाजाबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल अशीच मानसिकता कायम राहिली तर आपण योग्य वेळी लाखो समर्थकांह बौद्ध धम्माची दीक्षा घेणार, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.राममंदिराचा मुद्दा पुन्हा तापवला जात आहे. राममंदिर झाले अथवा नाही झाले तरी दलित-बहुजनांचा काही फायदा-तोटा नाही. त्यामुळे बहुजनांनी यापासून दूर राहावे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून आपली सत्ता हस्तगत करावी, असे आवाहन मायावती यांनी केले.
भाजप सरकार हे दलितांच्या द्वेषाचे राजकारण करत आहे. त्यामुळेच मी राज्यसभेचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मी दलितांसोबतच, आदिवासी, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय लोकांच्या उत्थानासाठी देशव्यापी दौरे करून काम सुरू केले आहे.