स्वाभिमान दुखावल्याने मी खासदारकीचा राजीनामा-नाना पटोले

0
7

गडचिरोली, दि.१७: मी ओबीसी व शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधानांच्या बैठकीत मांडले, त्यावेळी पंतप्रधान अंगावर आले. त्यांनी मला चूप बसवले. मी कुणाच्या भरवश्यावर निवडून आलो नाही, तर बहुजनांच्या भरवश्यावर विजयी झालो. स्वाभिमान दुखावल्याने मी खासदारकीचा राजीनामा दिला. पत्रकार मला भाजपचे बंडखोर खासदार म्हणतात. मी भाजपविरुद्ध नव्हे, तर मूठभर लोक करीत असलेल्या अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध बंड केले. ज्यांनी ओबीसी, शेतकरी व विद्यार्थ्यांचा गळा घोटून ३ पिढ्या बरबाद केल्या, त्यांच्याविरुद्ध मी सतत लढत राहीन, असे सांगून माजी खासदार नाना पटोले यांनी आज पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कुणबी महामेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ.बाळू धानोरकर, आ.सुनील केदार, प्रख्यात कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर, प्रा.दिलीप चौधरी, मेघा रामगुंडे, वैष्णवी डफ, प्रफुल्ल गुडधे, नरेंद्र जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते.कुणबी महामेळाव्याला जिल्ह्यातील जवळपास ३५ ते ४० हजार कुणबी समाज बांधवांची उपस्थिती होती. सकाळपासून गडचिरोलीच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मिळेल त्या वाहनाने कुणबी समाज बांधव गडचिरोलीत दाखल होत होते. यावेळी शहरातील चारही रस्ते गर्दीने फुलून गेले होते. गडचिरोलीच्या इतिहासातील ऐतिहासिक महामेळावा म्हणून सध्या या मेळाव्याची चर्चा सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मेळाव्यात पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, लोकशाहीत ज्यांची संख्या जास्त आहे ते मागायला येत नाहीत. मात्र सध्याचे सरकार सरकारविरोधात आवाज उठविणाºयास संपविण्याचे धोरण राबवित आहे. मात्र समाज एक झाल्यास समाजाला कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. पुढचा मुख्यमंत्री हा कुणब्याचा झाला पाहिजे, असो निश्चय कुणब्यांनी करावा, असेही नाना पटोले म्हणाले .शेतकरी संकटात आहे. त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. आणेवारीची इंग्रजकालीन पद्धत अजूनही सुरु आहे. ती बंद करण्याची मी मागणी केली. पंतप्रधानांच्या बैठकीत मी शेतकरी व ओबीसींचे प्रश्न मांडले, तेव्हा पंतप्रधान माझ्या अंगावर आले. मी त्यांच्या नव्हे, तर बहुजन समाजाच्या भरवश्यावर निवडून आलो. आम्ही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली. परंतु याच सरकारने सर्वोच्च न्यायालयात शिफारसी लागू करता येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. पंतप्रधान ओबीसींच्या हिताचे निर्णय घेत नाही, असे लक्षात येताच आम्ही त्यांची जात शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा २००१ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना खुल्या प्रवर्गात होते. नंतर ते तेली कसे झाले, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना गरिबांविषयी आस्था नाही. राज्य सरकारने मच्छिमारांची वाट लावली. विद्यार्थ्यांना ३ वर्षांपासून शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे ३ पिढ्या बरबाद झाल्या. ज्यांनी आमच्या आयाबहिणींना रस्त्यावर यायला भाग पाडलं, त्यांना विसरु नका. यापुढचा मुख्यमंत्री ओबीसी व्हावा, यादृष्टीने वाटचाल करा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी संत तुकाराम महाराजांना संपविले, आता हार्दिक पटेललाही संपविण्याचा प्रयत्न झाला. मलाही संपविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे भावनिक उद्गारही पटोलेंनी काढले. आम्ही कुणाच्या भिक्षेवर जगणारे नाही, असे सांगून पटोले म्हणाले की, कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकरी गुन्हेगार नसेल तर कशाची माफी देता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी पेसा कायदा शिथिल करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात काहीच केले नाही, असा आरोप पटोलेंनी केला. सुरजागड लोहप्रकल्प याच जिल्ह्यात व्हावा, अशी आमची भूमिका होती. परंतु ३ हजार पोलिसांच्या संरक्षणात खाणीतील लोहखनिज दुसरीकडे नेले जात आहे. संबंधित कंपनीचे सरकारशी साटेलोटे आहेत, असाही आरोप पटोले यांनी केला.

कुणबी समाजाच्या आवाजाला कुणीही धक्का लावणार नाही : आ. केदार
गडचिरोली येथे एकत्र आलेला हा कुणबी समाज राज्यातही एकत्र झाला आहे. इतक्या मोठ्या संख्येने मेळाव्याला सहभागी झालेल्या कुणबी समाजाच्या आवाजाला कुणीही धक्का लावू शकणार नाही. कोणतेही संकट आले तरी आपल्या माणसांच्या पाठीशी उभे रहा. कुणबी समाजाच्या एकतेला गालबोट लागता कामा नये, असे आवाहन महामेळाव्यात आ. सुनिल केदार यांनी केले.

गोडसेंचं नाव घेऊन गांधीजींचा जयजयकार चालणार नाही:प्रा.ज्ञानेश वाकुडकर

आम्हीही हिंदूच आहोत, पण आमचं हिंदुत्व शिवाजी महाराज आणि संत तुकारामाचं आहे. मात्र, काही मंडळी हिंदुत्वाच्या नावावर बहुजनांची दिशाभूल करीत आहेत. हे लोक गोडसेंचं नाव घेतात आणि तिकडे गांधीजींचाही अधूनमधून जयजयकार करतात. हे आता चालणार नाही, असा इशारा प्रख्यात कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी आज येथे दिला.

आहे कशी म्हणावी देशात लोकशाही

खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले छुपे शिपाई

या फांदीवरुन त्या फांदीवर मस्त मारता उड्या

विदेशातल्या शेळ्या हाकत किती सोडता पुड्या!

या कवितेने भाषणाची सुरुवात करुन प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी श्रोत्यांची मने जिंकली. प्रा.वाकुडकरांनी काव्यरुपात, तर कधी धारदार शैलीत सरकार व व्यवस्थेवर जोरदार आसूड ओढले. ते म्हणाले, हे सरकार लोकशाहीच्या मुळावरच घाला घालत आहे. यांना माणसांची कमी आणि गायीची चिंता जास्त आहे. येथे ओबीसी समाज ५२ टक्के आहे आणि त्याला केवळ एक मंत्रालय कसे देता, असा सवाल करुन प्रा.वाकुडकर यांनी आता आम्हाला मुख्यमंत्रिपद पाहिजे, असे ठणकावून सांगितले. केवळ आंदोलने करुन ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत, तर निवडणूक हेच त्याचे मोठे अस्त्र आहे.

भाजपा सरकार हे अपघाती सरकार – आ. बाळू धानोरकर
नोटाबंदी करुन पंतप्रधान मोदींनी महिलांच्या पैशावर डल्ला मारला. जनधन योजनेतून लोकांच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. उलट सरकारने ३५ कोटी लोकांचा विश्वासघात केला. ज्यांनी केवळ खारका-बदाम खाऊन पूजापाठ केले, ज्यांनी कधी शेती केली नाही, तेच लोकांना गोमूत्र आणि गायीच्या गोष्टी सांगायला लागले आहेत, अशी टीका करुन आ. धानोरकर यांनी हे सरकार ‘अपघाती सरकार’ असल्याचे सांगितले. प्रा.नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. प्रास्ताविक महेंद्र ब्राम्हणवाडे, तर आभार प्रदर्शन धनपाल मिसार यांनी केले.