बुलडाणा जिल्ह्याला एकाच दिवशी १० हजार १११ कोटी रूपयांचा निधी

0
11
????????????????????????????????????

सिंचन प्रकल्प पुर्ण करून जिल्ह्याचा होणार कायापालट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ङ्घ बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वीतीकरण कामाचा शुभारंभ

बुलडाणा, दि. १७ : राज्यामध्ये अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पुर्ण करून राज्य सुजलाम सुफलाम करण्याचे ध्येय राज्य शासनाने समोर ठेवले आहे. मागील काळात निधी अभावी रखडलेले, भूसंपादनाच्या फेऱ्यात फसलेले असे अपूर्ण प्रकल्प शासन बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून केंद्रीय अर्थसहाय्याने पुर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील जिगांव या मोठ्या प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करून जिल्ह्याचा निश्चितच कायापालट होईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
नांदुरा येथील कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात बळीराजा जलसंजीवनी योजनेचा कार्यान्वीतीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय महामार्ग भूमीपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधीत करताना मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, खासदार प्रतापराव जाधव, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशीकांत खेडेकर, ॲड आकाश फुंडकर, महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले, नगराध्यक्षा श्रीमती रजनी जवरे, पं.स सभापती अर्चनाताई पाटील, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव श्री. चहल, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज आदींसह अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याला इतिहासात प्रथमच सिंचन प्रकल्प व राष्ट्रीय महामार्ग कामांसाठी १० हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. या निधीमुळे जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर होणार आहे. सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या जिगांवला निधी कमी पडू दिल्या जाणार नाही.
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बांधा बांधावर पाणी अडविण्यात आले. त्यामुळे भूजल पातळी वाढली आणि दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. राज्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा बुलडाणा जिल्हा अव्वल ठरला आहे. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला कृषी पंप वीज जोडणी अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा शेतात मिळत आहे.
आमदार चैनसुख संचेती यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. चहल यांनी केले व राष्ट्रीय महामार्ग कामांची माहिती सार्व. बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. ठेंग यांनी दिली. कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी आमदार धृपदराव सावळे, अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे, डॉ. राजेंद्र फडके, राहूल संचेती आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्याचप्रमाणे परीसरातील नागरीक यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. संचलन महेश पांडे यांनी केले.

बळीराजा जलसंजीवनी योजना व राष्ट्रीय महामार्गाची कामे
बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत जिल्ह्यातील जिगांवसह ८ लघु प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. जिगांवसह बोरखेडी ता. लोणार, निम्न ज्ञानगंगा २ ता. खामगांव, आलेवाडी ता. संग्रामपूर, चौंढी ता. संग्रामपूर, दुर्गबोरी ता. मेहकर, दिग्रस (कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा) ता. दे.राजा, अरकचेरी ता. संग्रामपूर आणि राहेरा ता. मोताळा यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपुजन कामात खालील रस्ता कामांचा समावेश आहे : अजिंठा ते बुलडाणा महामार्ग दुपदरीकरण, शेगांव ते संग्रामपूर महामार्ग दुपदरीकरण, चिखली ते धाड महामार्ग दुपदरीकरण, नांदुरा ते जळगांव जामोद महामार्ग दुपदरीकरण, मेहकर ते अजीजपूर (लोणार) महामार्गाचे दुपदरीकरण, खामगांव ते दे. साकर्शा महामार्ग दुपदरीकरण, दे. साकर्शा ते मेहकर महामार्ग दुपदरीकरण, दे.राजा शहरातील राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा, संग्रामपूर ते बऱ्हाणपूर (राज्य सीमेपर्यंत) दुपदरीकरण तसेच नांदुरा शहराचा वळण मार्ग.