बेरार टाईम्सचा दणका;रस्ता बांधकामप्रकरणी चौकशी समिती

0
16
गोंदिया,दि.२९. -गोंदिया जिल्हा परिषद बांधकाम विभागांतंर्गत येत असलेल्या गोंदिया उपविभागातंर्गत ‘काम न करता ठेकेदाराने उचलले ३ लाख,अभियंत्याचा सहभाग’ या मथळ्याखाली बेरार टाईम्स पोर्टलने आज प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत विरोधी पक्षाचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी मुद्दा उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले.आणि बेरार टाईम्स न्युजपोर्टलने प्रकाशित केलेल्या वृत्ताची माहिती देत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
त्यावर सभागृहात उपस्थित जि.प.अध्यक्ष उषा मेंढे व सीईओ रविंद्र ठाकरे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देत चौकशी समिती नेमण्यात येत असल्याचे सांगितले. गोंदिया जि.प.बांधकाम उपविभागातर्गंत गोंदियाच्या उपअभियंत्याने ठेकेदाराला हाताशी धरुन चक्क रस्ताच खाऊन टाकला नव्हे तर त्या रस्ता बांधकामाचे २ लाख ९६ हजार ११६ रुपयाचा बिल काम न करताच उचलल्याचे प्रकरण बेरार टाईम्सने उघडकीस आणले त्यामध्ये जि.प.बांधकाम उपविभागातंर्गत फुलचूर ते छोटा गोंदिया या रस्ता बांधकामासाठी २२ मे २०१७ रोजी २ लाख ९६ हजार ८८६ रुपयाच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले.त्यासाठी बाळकृष्ण मजूर सहकारी संस्थेला कंत्राट देण्यात आले होते.परंतु या रस्त्यावर एकही ट्रिप मुरूम व गिट्टी न घालता काम करण्यात आल्याचे दाखवून बिल काढल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.या प्रकरणाची सीईओ ठाकरे यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिले.तर दुसरीकडे बांधकाम विभागाच्या 3054 व 5054 हेडअंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या कामांच्या यादीमध्ये पारदर्शकता नसून जि.प.अध्यक्षांनी मनमर्जीने यादी तयार केल्याचा आक्षेप घेत बांधकाम विभागाच्या सभापती व जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्या नेतृत्वात भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार घातला.तर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र जि.प.अध्यक्षांनी सादर केलेल्या यादीला समर्थन देत यादी मंजूर करवून घेतली.बैठकीला काँग्रसचे सर्व सभापती,जि.प.सदस्य रमेश अंबुले,राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,राजलक्ष्मी तुरकर,गणेश हर्षे आदी उपस्थित होते.