भंडारा कौशल्ययुक्त जिल्हा व्हावा – ना. रणजित पाटील

0
10

मोहाडी येथे रोजगार मेळावा
भंडारा दि. 7:- महाराष्ट्र शासनाने 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचा निर्धार केला असून त्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने राज्यातील तरुण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षण मोठया प्रमाणात दिले आहे. भंडारा जिल्हयामध्ये स्वंयरोजगाराला वाव असून भंडारा जिल्हा कौशल्ययुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, भंडारा यांच्या वतीने मोहाडी येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मो.तारिक कुरेशी हे होते. आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, नगराध्यक्ष स्वाती लिमजे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक संचालक शैलेश भगत व विविध पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ना. रणजित पाटील म्हणाले की, जगातील इतर देशाच्या तुलनेत भारताकडे मानव संसाधन अधिक आहे. हे संसाधन कौशल्ययुक्त झाल्यास देश अधिक प्रगत होईल. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात प्रथमच कौशल्य विकास विकास हे मंत्रालय सुरु केले. महाराष्ट्रात या मंत्रालयाअंतर्गत प्रशिक्षणाची योजना राबविली जात आहे. शिक्षणासोबतच प्रशिक्षण आवश्यक असून युवक –युवतींनी आपल्या मधील गुण व कौशल्य ओळखून त्यानुसार क्षेत्र निवडावे. केवळ नौकरीच्या मागे न धावता कौशल्याच्या बळावर स्वत:चा रोजगार स्वत: निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाचा कौशल्य प्रशिक्षणावर मोठा भर असुन व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना कौशल्य प्रशिक्षणाचा विशेष अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. मोहाडी नगर पंचायतने स्वच्छतेत चांगले कार्य करावे असे सांगून पाटील म्हणाले की, मोहाडी शहराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. शासन निधी देईल. मात्र हा आराखडा सर्वंकष असावा.
यावेळी बोलतांना आमदार चरण वाघमारे म्हणाले की, युवकांनी केवळ नौकरीच्या मागे न धावता रोजगार करण्यावर भर दयावा. स्वत:च्या रोजगाराच्या संधी स्वत: निर्माण कराव्यात. या मेळाव्यात नौकरीची हमी न मिळाल्याने नाराज न होता स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा घेवून जावे असे ते म्हणाले. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 700-800 लोकांनी रक्तदान केले असून या क्षेत्रात ब्लड ऑन कॉल योजना यशस्वी होत आहेत. हा मेळावा युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणारा ठरेल असे ते म्हणाले.
भंडारा जिल्हयात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असून यावर आधारीत जिल्हयाच्या विकासाचे व्हीजन प्रशासनाने तयार केल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. कृषी, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग व पशुसंवर्धन हा पंचसुत्री कार्यक्रम प्रशासन राबविणार आहे. या पंचसुत्रीमधून रोजगारांच्या अनेक संधी निमा्रण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच पर्यटनाला वाव दिला जाणार असून युवकांनी या माध्यमातून रोजगारक्षम व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तारिक कुरेशी व प्रकाश बाळबुधे यांनी युवकांना स्वयंरोजगाराबद्दल प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अनुराधा पॅरामेडीकलच्या विद्यार्थींनीचा ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक शैलेश भगत यांनी केले. जिल्हयात 6 रोजगार मेळावे घेवून ग्रामीण भागातील दीड हजार विद्यार्थ्यांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात विविध कंपन्यांनी आपले स्टॉल लावले होते. या मेळाव्यास युवक-युवती मोठया संख्येने उपस्थित होते. आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्दान शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे हस्ते करण्यात आले.