पाण्याचा योग्य वापर करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
6

गोंदिया,दि.१० : यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५५ टक्केच पाऊस पडलेला आहे. दरवर्षी १३२७ मि.मी. पाऊस पडतो. यावर्षी मात्र ७५९ मि.मी. पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी व नागरिकांनी दैनंदिन वापरासाठी पाण्याचा योग्य वापर करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार कोणीही कुठल्याही खाजगी कारणासाठी किंवा इतर कारणासाठी ६० मीटर (१९६.८ फुट) पेक्षा जास्त खोलीची बोर(कुपनलिका) करता येणार नाही. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक गाव आणि वस्तीतील पिण्याच्या पाण्यावर परिणाम करेल असा कुठल्याही १ कि.मी. परिसरातील बोर/विहीर यांच्यावर लक्ष्य ठेवून त्याचे पाणी कुठल्याही प्रकारच्या सिंचनासाठी वापरण्यात येवू नये किंवा वापर केल्यास जर पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर परिणाम होणार असेल तर त्यांना परवानगी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे.
पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार नाही अशाप्रकारे सर्व शेतकऱ्यांनी गावातील पाण्याच्या विंधन विहिरी तसेच ज्यांच्या विहिरी गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून दूर आहेत परंतू ६० मीटर (१९६.८ फुट) पेक्षा कमी खोलीच्या बोर आहेत त्यांनी देखील ज्या पिकांना पाणी कमी लागतो अशा गहू, हरभरा, लाखोळी, जवस, भाजीपाला इत्यादी प्रकारच्या पिकांची लागवड केली तर पुढच्या तीव्र पाणी टंचाईला तोंड देता येईल. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, पाण्याचा सिंचनासाठी शेतकऱ्यांनी तसेच दैनंदिन वापरासाठी नागरिकांनी योग्य वापर करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी गोंदिया यांनी केले आहे.