खरपुंडीत तापाची साथ, २६ विद्यार्थी रुग्णालयात भरती

0
6

गडचिरोली, दि.20: येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या खरपुंडी येथे तापाची साथ पसरली असून, आज तब्बल २६ विद्यार्थ्यांना अचानक ताप आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.नेहमीप्रमाणे  शुक्रवारला सकाळी १० वाजता खरपुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरली. दुपारी अचानक दोन-तीन विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही वेळाने अन्य विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तोच प्रकार होऊ लागला. तब्बल २६ विद्यार्थी आजाराला बळी पडल्याचे लक्षात आले. लगेच शिक्षिकेने ही माहिती सरपंच आनंदराव नैताम यांना दिली. श्री.नैताम यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून दोन रुग्णवाहिका बोलावल्या. या रुग्णवाहिकांद्वारे आजारी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉ.अनिल रुडे व अन्य डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता २४ विद्यार्थ्यांना व्हायरल फ्ल्यू, तर दोघांना हिवतापाची लागण झाल्याचे निदान झाले. युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी रुग्णालयात जाऊन आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि डॉक्टरांना योग्य उपचार करण्याची सूचना केली.