दोन वर्षात नवेगावबांधचा कायापालट करणार- राजकुमार बडोले

0
13

नवेगावबांध येथे बालोद्यानाचे भूमीपजून
नवेगावबांध(सतिश कोसरकर),दि.२१ : नवेगावबांध जलाशय परिसराचा सन १९७१ ते १९९१ हा काळ उत्कर्षाचा होता. त्यानंतर या परिसराच्या अधोगतीला सुरुवात झाली. नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत आणि जास्तीत जास्त स्थानिकांना यामधून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. येत्या दोन वर्षात नवेगावबांध जलाशय परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट करण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
२१ जानेवारी रोजी नवेगावबांध जलाशयाजवळ बालोद्यान तयार करणे, चौकीदार कक्ष आणि बालोद्यानासमोर सौर ऊर्जा लाईट लावण्याच्या कामाचे भूमीपूजन श्री.बडोले यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सडक/अर्जुनी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, सडक/अर्जुनीच्या माजी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, अर्चना राऊत, माजी जि.प.सदस्य रामदास कोहारकर, श्रीमती विजया कापगते, नवेगावबांधचे सरपंच अनिरुध्द शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, केवलराम पुस्तोडे, लायकराम भेंडारकर, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर, नवेगावबांध फाउंडेशनचे अध्यक्ष विजय डोये, नितीन गुगलिया, नवल चांडक यांची उपस्थिती होती.
श्री.बडोले म्हणाले, नवेगावबांध पर्यटनस्थळाची ओळख देशपातळीवर होईल अशा पध्दतीने विकसीत करण्यात येईल. १० पट पर्यटक जास्त येतील यादृष्टीकोनातून इथला विकास करण्यात येईल. या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी ५० कोटी रुपये देण्याचे तत्वता मान्य केले आहे. लवकरच याला मंजूरी देण्यात येईल. ८० लक्ष रुपये खर्चातून झिप लाईन सुरु करण्यात येईल. पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टचे बांधकाम पुर्णत्वास येत आहे. २५ लक्ष रुपयातून स्टेप गार्डन आणि ६० लक्ष रुपयांच्या निधीतून दुसऱ्या बाजूच्या बीचचे काम सुरु करण्यात येईल. संजय कुटीपर्यंत पर्यटकांसाठी मिनी ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती गहाणे, रामदास बोरकर यांची समायोचित भाषणे झाली. यावेळी नवेगावबांध येथील ग्रामस्थ तसेच पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच अनिरुध्द शहारे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांनी मानले.