वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहावे- पालकमंत्री राजकुमार बडोले

0
9

सायबर गुन्हेविषयी जनजागृती अभियान
गोंदिया,दि.२३ : मोठ्या प्रमाणात इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत गोंदिया पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने २३ जानेवारी रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सायबर तज्ञ म्हणून पियुष वर्मा व आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कमलेश वालदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्रच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, समाजाला सायबर गुन्हेगारीविषयी जागरुक करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रातील मुलांनी पोलीस विभागाच्या मदतीने मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मॅरॉथॉन स्पर्धेत सहभाग घेतला ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. आज पोलीस विविध क्षेत्रात चांगले काम करीत असल्यामुळे लोकांचे मित्र असल्याची भावना जनमाणसात तयार होत आहे, ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांच्या नेतृत्वात पोलीस विभाग चांगले काम करीत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, मागास व दुर्गम भागातील मुलां-मुलीमध्ये चांगली जडणघडण करण्याचे काम पोलीस करीत असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास सुध्दा निर्माण करुन त्यांना यशाचा मार्ग दाखविण्यात येत आहे. रन फॉर डेमॉक्रसी ॲन्ड डेव्हलपमेन्टच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून या मुलांचे करियर घडविण्याचे काम पोलीस विभाग करीत आहे ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे श्री.बडोले म्हणाले.
श्री.वालदे म्हणाले, बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशाचा व्यवहार होत असतो. त्यासाठी नागरिकांनी बँकेत व्यवहार करतांना सदैव जागरुक राहून सावध राहिले पाहिजे. सोशल मिडियावर आपली वैयक्तीक माहिती देवू नये, जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही. यासाठी सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी त्यांनी इंटरनेट बँकींग, फिशींग, मोबाईल बँकींग, स्मीशिंग, युपीआय, ई-वॅलेटस्, युएसएसडी, कार्डस्, युपीआय, विशिंग फ्रॉडस्, लॉटरी फ्रॉडस्, सोशल मिडिया फ्रॉडस्, आयडेन्टीटी थेफ्ट याबाबत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे सविस्तर माहिती दिली.
यावेळी कार्यशाळेत उपस्थित असलेल्या नागरिकांमधील रामअवतार अग्रवाल, आदेश शर्मा व पोलीस निरिक्षक श्री.दासुरकर यांनी बँकींग फ्रॉड व्यवहाराबाबत काही प्रश्न विचारले. त्यावर श्री.वालदे यांनी त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले.सायबर जनजागृती कार्यशाळेला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मंदार जवळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती खन्ना, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक व महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन पोलीस उपनिरिक्षक राधिका कोकाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.