देवरी ग्रामीण रुग्णालयातील त्या ३० मच्छरदाण्या गेल्या कोठे?

0
14

गोंदिया,दि.२४- जंगलव्याप्त आदिवासी भागातील लोकांचे मलेरिया व डेंग्यू या आजारांपासून संरक्षण करता यावे, यासाठी आदिवासी उपयोजनेतून मलेरिया विभागाला निधी देण्यात येतो. या निधीतून संबंधित विभाग जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय आणि संवेदनशील गावातील नागरिकांना राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, डिसेंबर २०१६ मध्ये देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाला पुरविण्यात आलेल्या ३० मच्छरदाण्या अद्यापही रुग्णांच्या बिछाण्याला कधीही लावण्यात न आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या ३० मच्छरदाण्या कोठे गेल्या? याची चौकशी संबंधित विभाग करणार का? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांनी सरकारला केला आहे.
आरोग्य विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आठही ग्रामीण रुग्णालयांना मच्छरदाण्यांचा पुरवठा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत मलेरिया आणि डेंग्यूसाठी अतिसंवेदनशील असणाèया आदिवासी भागातील गावातील नागरिकांना सुद्धा या मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा गेल्या ५ डिसेंबर २०१६ मध्ये ३० मच्छरदाण्यांचा पुरवठा केला गेला. याशिवाय शहरातील सामाजिक कार्यकत्र्यांनी सुद्धा काही मच्छरदाण्या ग्रामीण रुग्णालयाला भेट स्वरूपात दिल्या. भेट म्हणून मिळालेल्या मच्छरदाण्या तर रुग्णांच्या खाटांना लावण्यात आल्या. मात्र, मलेरिया विभागाकडून पुरविण्यात आलेल्या त्या ३० मच्छरदाण्या अद्यापही रुग्णाच्या नजरेस पडल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. या रुग्णालयात येणारे रुग्ण हे आपल्याकडील मच्छरदाण्यांची सोय करून डासांपासून स्वतःचे संरक्षण करीत असल्याचे चित्र आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या रविवारी (दि.२१) सुंदरीदंड येथील शामकला प्रल्हाद दर्रो या महिला रुग्णाच्या भावाला आपल्या बहिणीचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी नांगोटाला या स्वतःच्या गावावरून मलेरिया विभागाने दिलेली मच्छरदाणी आणावी लागली. भागी येथील राजू पेटकुले या रुग्णाने सुद्धा घरून मच्छरदाणी आणल्याचे सांगितले.
एकीकडे आदिवासी भागातील जनतेचे रक्षण करण्यासाठी शासन मोफत मच्छरदाण्याचे वाटप करते. दुसरीकडे, ग्रामीण रुग्णालयाला मिळालेल्या ३० ही मच्छरदाण्यांची परस्पर विल्हेवाट लावली जात असेल तर तर आदिवासी भागातील आरोग्य कितपत सुरक्षित आहे, याची कल्पना न केलेली बरी. मलेरिया विभागाने पुरविलेल्या त्या ३० मच्छरदाण्या कोठे गेल्या? याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.