धावत्या पोदार इंटरनॅशनल स्कूल बसच्या चालकाला ‘हार्टअटॅक’

0
8

गोंदिया दि.२५ : : धावत्या स्कूलबसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका आॅटोसह तीन दुचाकींना बसने धडक दिली. ही घटना गुरूवारी (दि.२५) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शहरातील जयस्तंभ चौकातून गणेशनगरकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हाणी झाली नसून बसमधील विद्यार्थी देखील थोडक्यात बचावले.वल्लभ जयस्वाल (५८) असे स्कूल बस चालकाचे नाव आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी चालकाला त्वरीत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच बसमधीेल सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
प्राप्त माहितीनुसार, हिवरा येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस (एमएच ३५-के ३७२६) गुरूवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडण्यासाठी गणेशनगरकडे जात होती. या बसमध्ये एकूण ३० विद्यार्थी होते. यापैकी २४ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर उर्वरित सहा विद्यार्थ्याना सोडण्यासाठी ही बस गणेशनगर जात होती. दरम्यान या स्कूल बसच्या चालकाने जयस्तंभ चौकातून गणेशनगरकडे जाण्यासाठी वळण घेतले असता बस चालक वल्लभ जयस्वाल यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे बसवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका आॅटोला धडक दिली. त्यानंतर बस नियंत्रीत करण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगत असलेल्या एक पानठेला आणि तीन दुचाकी वाहनांना धडक दिली. या धडकेत दुचाकीचे नुकसान झाले तर एक मोटार सायकल या स्कूल बसच्या चाकात अडकल्याने ती काही अंतरावर फरफटत गेली. हीच दुचाकी बसच्या सामोरील चाकात फसल्याने बस थांबली. दरम्यान एलआयसी आॅफीस आणि पेट्रोलपंप जवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत विद्यार्थ्यांना स्कूलमधून बाहेर काढले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. बस चालकाला ह्दययविकाराचा झटका आल्यानेच हा अपघात घडल्याचे उपस्थितांनी सांगितले. दरम्यान या घटनेचीे नोंद शहर पोलिसांनी केली आहे.विशेष म्हणजे, सतत वर्दळ असलेल्या जयस्तंभ चौकात सुद्धा वाहतुक नियंत्रक पोलीस शिपाई उपस्थित नव्हते. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी याबद्दल संताप व्यक्त केला.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नुकतेच स्कूल बसेसच्या ‘फिटनेस’ आणि सुरक्षेवरुन शाळा संचालकांना फटकारले होते. तसेच स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करण्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले. त्यानंतर स्कूल बस अपघाताच्या घटना घडत असल्याने स्कूल बसेसच्या ‘फिटनेस’वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.