चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रकल्प सल्लागार नेमण्यास मान्यता

0
10

मुंबई,दि.30ः-चंद्रपूर येथील 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांच्या रुग्णालयांतर्गत विविध इमारतींच्या बांधकामासाठी एचएचसीसी इंडिया या कंपनीची टर्न की तत्त्वावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयास राज्य शासनाने 2013 मध्ये मान्यता दिली. त्यानंतर यासाठी चंद्रपूर येथील चंदा रयतवारी येथील जमीन अधिग्रहित करण्यात आली. केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर 2015-16 मध्ये हे महाविद्यालय सुरू झाले असून महाविद्यालय व रूग्णालयांतर्गत येणाऱ्या विविध इमारतींच्या बांधकामांसाठी 535 कोटी 87 लाख 8 हजार रकमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याविषयी केंद्र शासनाच्या अंगीकृत उपक्रम असलेल्या काही कंपन्यांकडून महाविद्यालय इमारतींच्या बांधकामासाठी टर्न की तत्त्वावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीबाबत थेट प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी नमुद सेवा शुल्क, प्रस्तावित रुग्णालयाचे शास्त्रोक्त पद्धतीने व जलदगतीने बांधकाम करणे आदी बाबी विचारात घेऊन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील प्रामुख्याने बांधकामाशी संबंधित एचएससीसी (इंडिया) लिमिटेड (HSCC (INDIA) LIMITED) या कंपनीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कंपनीशी करार करण्यासाठी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
यासोबतच शासनाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालये व रूग्णालयांच्या 25 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामासाठी एनबीसीसी, एचआयएल, एचएससीसी या सार्वजनिक उपक्रम असलेल्या कंपन्यांकडून दर मागवून टर्न की तत्त्वावर नेमणूक करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.