आ. चरण वाघमारे व नगरसेवकाला मारहाण

0
11

तुमसर,दि.01ः- मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेले आ. चरण वाघमारे व नगरसेवक श्याम धुर्वे यांना माजी आमदार सुभाष कारेमोरे यांचे पुत्र डॉ. पंकज कारेमोरे यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी तुमसर शहरात रास्तारोको करीत जाळपोळ केली. पोलिस ठाण्यात हजारो कार्यकर्त्यांचा जमाव जमला. पोलिसांनी डॉ. पंकज कारेमोरेला अटक केली असली तरी शहरात तणावाचे वातावरण आहे. रात्री ७.३0 वाजता अपर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी तुमसरात भेट दिल्यानंतर आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तुमसर नगर परिषेदच्या स्थापनेला १५0 वर्षे पूर्ण झाल्याने नगर परिषदेचा शतकोत्तर महोत्सव सात दिवस साजरा केला जात आहे. दि. ४ फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्र मासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमसरात येत असून त्यांची सभा संताजी सभागृहाच्या शेजारील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी मैदानावर पेंडॉल टाकण्याचे काम बुधवारपासून सुरू झाले. या मैदानाच्या बाजूलाच डॉ. पंकज कारेमोरे यांचे रुग्णालय आहे.
दुपारी ४ च्या सुमारास आ. चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व नगरसेवक शाम धुर्वे, पंकज बालपांडे व अन्य पदाधिकारी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले. त्याठिकाणी डॉ. पंकज कारेमोरे व आ. चरण वाघमारे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद सोडविण्यास गेलेले नगरसेवक नगरसेवक शाम धुर्वे यांना डॉ. कारेमोरे यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.