बांबूपासून तयार झालेल्या वस्तूंचा दैनंदिन जीवनात वापर करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
58

नागपूर,दि.03 : बांबूपासून दैनंदिन वापराच्या वस्तूसोबतच सजावटीसाठी कलात्मक वस्तूंची निर्मिती बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत असून ग्रामीण कारागिरांनी अत्यंत कुशलतेने तयार केलेल्या बांबूंच्या वस्तूंचा वापर दैनंदिन जीवनात करावा, असे आवाहन राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सेमिनरी हिल या परिसरात बांबूपासून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तूंच्या विक्रीसाठी विशेष बांबू शॉपी सुरु करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पहिल्या बांबू शॉपीचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वन राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, आमदार सुधाकर देशमुख, वन विभागाचे सचिव विकास खारगे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी.एस.के. रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, अजय पाटील, नगरसेविका श्रीमती प्रगती पाटील, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. भगवान आदी यावेळी उपस्थित होते.
बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध कलात्मक वस्तूसोबतच बांबूपासून तयार करण्यात आलेले कापडाच्या वस्तू विक्रीसाठी नागपूरकरांना तसेच पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. बांबूपासून विविध कलात्मक वस्तू तयार करण्यासाठी उपजीविकेचे साधन म्हणून ग्रामीण भागातील कारागिरांचा या उद्योगांमध्ये समावेश आहे. यालाच आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षणाची जोड देऊन परंपरागत बांबू उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न वन विभागातर्फे करण्यात येत आहे.
नागरिकांनीही बांबूपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन करताना बांबूचे फर्नीचर अत्यंत टिकाऊ, आकर्षक यामध्ये खुर्ची, फळी, स्टूल, टेबल, दैनंदिन वापरासाठी फुलदानी, चहाचे कप, मग, पेला, पेन स्टॅण्ड, लॅम्प, घरांसोबतच घराच्या सजावटीसाठीही बांबूचा वापर वाढत असल्यामुळे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून बांबूच्या वस्तूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.