अहेरीत लागलेल्या आगीत २५ एकर तुरीचे शेत भस्मसात

0
13

अहेरी,दि.03:- येथुन ७ किमी अंतरावर असलेल्या महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या तुरीच्या पिकांना शनिवारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर मधील तुरीचे पीक जळून खाक झाले.
सविस्तर वृत्त असे की शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीचे महागाव लगत २५ एकर शेत असून या शेतात त्यांनी तुरीचे पीक घेतले होते. यात १२ एकरातील पीक घेऊन ते एका ठिकाणी साठवून ठेवले होते. तसेच उर्वरित १२ एकरात तुरीचे पीक लावून होते. मात्र शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान शेतातील एका कोपर्यातून आगीचे धूर निघताना दिसले. ही बाब समजताच शंकर गोंगले व तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष संजय अलोने यांनी शेताकडे धाव घेतली. संजय अलोने यांनी त्वरित अहेरी नगर पंचायत चे मुख्याधिकारी डॉ कुलभूषण रामटके यांना याची माहिती दिली. लगेच अहेरी नगर पंचायतचे अग्नीशामक वाहन निघाले मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले व संपूर्ण पीक यात जळून खाक झाले. यात शंकर गोंगले यांचे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचले. तलाठी राजेंद्र आव्हाड यांनी पंचनामा केला.ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणी मुद्दाम लावली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे.