ग्रामीण भागाच्या भविष्यासाठी स्वच्छतेशिवाय पर्याय नाही

0
11

सडक अर्जुनी,दि.06ः- तालुक्यातील अनेक गावात आज स्थितीला निम्यापेक्षा जास्त घरात शौचालय नाहीत.गावामध्ये वर्षाला मोठमोठे कार्यक्रम होतात यावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.मात्र शौचालयाचे नाव काढले की,सरकारी योजनांचा लाभ पोहचत नसल्याची अनेकांची तक्रार असते.ग्रामीण भागातील लोकांना आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी सरकारी योजनांवर अवलंबून राहण्याची सवय झाली आहे.त्यातच  आरोग्य,शिक्षण,स्वच्छतेसाठी सरकारवरच अवलंबुन राहतात.आपल्या आरोग्याशी सबंधित शौचालय बांधणे हे सरकारी योजनांवर अवलंबुन न राहता केले पाहिजे हे जनतेच्या लक्षात आणण्यासाठी जनजागृतीची गरज असून ग्रामीण भागाच्या भविष्यासाठी स्वच्छतेशिवाय पर्याय नसल्याचे पटविण्यात कुठे तरी प्रशासन अपयशी ठरल्यानेच आजही गावखेड्यात शौचालयाची वाणवा असल्याचे दिसून येत आहे.                                                                                              आज ग्रामीण भागही भौतीक सुख सुविधांच्या वापराच्या बाबतीत मागे नाही.प्रत्येक तरुणांच्या हातात महागडे स्मार्टफोन व महागडी दुचाकी दिसते.घरी मात्र शौचालय नाही.आणि ज्याच्या घरी योजनेमार्फत मिळालेले शौचालय आहेत ते आंघोळी साठी वापरत शौचास मात्र बाहेर जातांनाचे चित्र आजही बघावयास दिसून येते.सरकारी योजनांचा गैरवापर होत असेल तर कसे होणार निर्मल ग्राम ?शौचालय निर्मितीसाठी वैयक्तीक तसेच सामाजिक स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. गावकर्यांना शौचालयाचे प्रश्न आपल्या आरोग्यावर व स्वच्छतेशी कसे निगडीत आहे मार्गदर्शन करण्याची गरज ग्रामीण भागात असल्याचे दिसून येत आहे.