राका येथे रोजगार सेवकाची चौथ्या ग्रामसभेत निवड

0
14

सडक अर्जुनी,दि.06(बबलू मारवाडे)ः- तालुक्यातील राका ग्रामपंचायत येथे ग्रामसभेचे आयोजन करुन ग्रामरोजगारसेवकाची निवड करण्यात आली आहे.या निवडीदरम्यान नागरिक व पदाधिकारी यांच्यात बाचाबाचीचे दृश्य सुध्दा बघावयास मिळाले.राका ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या आधीच्या रोजगार सेवक नसीम शेख यांनी चार महिन्यापुर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर देखरेख ठेवण्यासह इतर कामात अडचण जात असल्याने रोजगार सेवकासाठी जाहिरात देऊन इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते.त्यात महिला व पुरूष असे पंधरा उमेदवारानी अर्ज सादर केले.त्या अर्जावर चर्चा करुन निवड करण्याच्या अनुषंगाने ग्रा.प.ने ग्रामसभा बोलवली. परंतु ती सभा कोरम पूर्ण होत नसल्याने तहकूब करण्यात आली होती.ती तहकुब सभा काही दिवसांनी परत घेण्यात आली. त्या सभेत पंधरा उमेदवारांपैकी शासन नियमानुसार काही उमेदवाराची वय मर्यादा  पस्तीस अट असल्याने काहींचे अर्ज रद्द करण्यात आले.त्यानंतर स्पर्धेत पंधरा पैकी सहा उमेदवार राहिले. त्यात सचिव शहारे यांनी शासन नियमानुसार उच्च शिक्षणला महत्व देत अशोक चांदेवार हे पात्र असल्याने त्यांची निवड करण्यात येत असल्याचे जाहिर केले.त्यावरही सरपंचासह अनेकांनी आक्षेप घेतल्याने ती निवड प्रकिया पुन्हा रद्द झाली.त्यातच सरपंच रेखा चांदेवार यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह पंचायत समितीला लेखी तक्रार करुन सचिवांनी परस्पर निवड केल्याचे सांगत परत ग्रामसभा घेऊन निवडीची मागणी केली होती.त्यानुसार परत 3 फेबुवारीला ग्रामसभा घेण्यात आली असता निवडणुकीच्या माध्यमातून रोजगारसेवकाची निवड करण्याची मागणी समोर आली.तेव्हा शिक्षित युवकांनी मात्र शासन निर्णयानुसार जो उच्च शिक्षित असेल त्याचीच निवड करण्याच्या हट्ट धरला.त्यामुळे अखेर सरपंच रेखा चांदेवार,उपसरपंच वसंत उपरीकर,सदस्य जनार्दन मेंढे,राजीराम चांदेवार,कांता नागोसे,पुष्पा गोटेफोटे,अर्चना मेश्राम यांना उच्च शिक्षित असलेल्या अशोक चांदेवार यांचीच निवड करण्यात येत असल्याची घोषणा चौथ्या ग्रामसभेत करावी लागली.