प्रतापगड यात्रेकरुंना सुविधा उपलब्ध करुन दया- पालकमंत्री बडोले

0
10

महाशिवरात्री यात्रा व उर्स तयारी आढावा
गोंदिया,दि.६ : प्रतापगड येथे होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेला आणि ख्वाजा उस्मान गनी हारुनी यांच्या उर्सला मोठ्या संख्येने लाखो भाविक येणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडला यात्रा व उर्सनिमीत्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने यंत्रणा आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयातून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे ५ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री बडोले यांनी येत्या महाशिवरात्रीपासून होणाऱ्या यात्रा व उर्स निमित्ताने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जि.प.अध्यक्ष श्रीमती सीमा मडावी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य श्रीमती रचना गहाणे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती कासीम जामा कुरेशी, सडक/अर्जुनी पं.स.उपभापती राजेश कठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नेवले, प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर, तहसिलदार छगन भंडारी, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रतापगड सरपंच अहिल्याबाई वालदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
देवस्थान आणि दर्ग्याकडे जातांना ज्या झाडांची भाविकांना अडचण होते अशा झाडांच्या फांदया तोडाव्यात असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, यात्रा व उर्स दरम्यान वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी तात्पुरत्या स्वरुपात थ्री फेजवर वीज पुरवठा उपलब्ध करुन दयावा. जिल्हा परिषदेच्या निधीतून यात्रा-उर्ससाठी ३ लक्ष रुपये तातडीने दयावे. यात्रेदरम्यान दुषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घेवून पाण्याचे निर्जंतुकीरण करावे. मोठ्या संख्येने भाविक येत असल्यामुळे सहा रुग्णवाहिका यादरम्यान तैनात ठेवाव्यात. यात्रा संपल्यानंतर आरोग्य विभागाने रोगराई पसरणार नाही यासाठी फॉगींग मशीनद्वारे फवारणी करावी. पार्कींगमुळे वाहतूकीस अडथळा होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, दर्ग्याकडे जाणाऱ्या मार्गावर अडथळा होणार नाही यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. प्रतापगड किल्ल्याचे महत्व लोकांना माहीत व्हावे याकरीता किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती करावी. पासेस असलेल्या गाड्यांनाच दर्ग्यापर्यंत जावू दयावे. आवश्यक त्या ठिकाणी पोलीस विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. यात्रेदरम्यान बंदोबस्ताकरीता येणाऱ्या पोलिसांच्या मुक्कामासाठी नक्षलग्रस्त भागासाठी मिळणाऱ्या निधीतून सभागृह बांधण्यात यावे. यात्रेकरुंसाठी पुरेसे शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष्य दयावे. प्रतापगड ते दिनकरनगर रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूला मुरुम टाकण्यात यावा. त्यामुळे अपघात होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान यात्रेसाठी गोंदिया, साकोली, पवनी व भंडारा येथून अतिरिक्त बसेस सोडाव्यात असे सांगून श्री.बडोले म्हणाले की, त्यामुळे यात्रेकरुंची गैरसोय टाळता येईल. १० फेब्रुवारीपासून इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध होईल. यात्रेकरुंसाठी मोबाईल शौचालय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. यात्रा व उर्स दरम्यान येणाऱ्या भाविकांना विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी विविध विभागाने स्टॉल लावावे असेही त्यांनी सांगितले.
श्री.दयानिधी म्हणाले, यात्रा संपल्यानंतर तिथे पसरलेल्या अस्वच्छतेमुळे रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. ही रोगराई पसरुच नये यासाठी गावात त्वरित फवारणी करण्यासाठी जिल्हा परिषदेमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. यात्रेदरम्यान दुषित पाणी पिण्यात येवू नये म्हणून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी यात्रा-उर्स दरम्यान येणाऱ्या अडचणी जि.प.सदस्य रचना गहाणे, दर्गा समितीचे अध्यक्ष हाजी सत्तारभाई, श्री.लोगडे यांच्यासह काही ग्रामस्थांनी मांडल्या. तहसिलदार भंडारी, गटविकास अधिकारी जमईवार तसेच तालुकास्तरीय यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यानच्या यात्रा व उर्ससाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. यावेळी काही यंत्रणांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सी.डी.गणवीर यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी श्री.भावे यांनी मानले.