बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप हस्तांतरण सोहळा दीक्षाभूमीवर आज

0
24

नागपूर,दि.10 : लॉर्ड बुद्धा टीव्ही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज  १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बौद्ध विवाह कायदा प्रारूप हस्तांतरण सोहळा दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे.
शासनाने बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप तयार करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश सी.एल. थूल यांच्या अध्यक्षतेखाली एका मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये अ‍ॅड. दिलीप काकडे, बबन कांबळे, भय्याजी खैरकर, आ. डॉ. मिलिंद माने, विजय कांबळे, डी. आर. महाजन, अ‍ॅड. अविनाश बनकर, भदंत राहुल बोधी आदी सदस्य होते. या समितीने अनेक बैठका घेऊन बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप तयार केले असून ते आता महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वाधीन करण्यासाठी हा समारोह आयोजित करण्यात आला आहे.
हिंदू मॅरेज अ‍ॅक्टमध्ये बौद्ध, शीख व जैन इत्यादी येत होते. मुस्लिमांचा पर्सनल लॉ झाला. शीखही हिंदू मॅरेज अ‍ॅक्टच्या बाहेर आले. ख्रिश्चन व २०१२ साली जैनही हिंदू मरेज अ‍ॅक्टच्या बाहेर आले. तेव्हा बौद्ध धम्माचाही स्वतंत्र विवाह कायदा असावा, अशी मागणी पुन्हा जोर धरायला लागली. त्या पार्श्वभूमीवर बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप तयार झाले असून हे प्रारूप दीक्षाभूमीवर बौद्ध जनतेच्या साक्षीने महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राजकुमार बडोले यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असे सचिन मून, मोनाली थूल आणि डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.