ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ करणार- ना. सुधीर मुनगंटीवार

0
18

चंद्रपूर  दि. 10:मुबलक पराक्रमी वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपूल वनसंपदा, पक्षांच्या शेकडो प्रजाती आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारे मनमोहक फुलपाखरांचे जग ताडोबातून परत जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपण पर्यावरणाचे देणे लागतो, हे निश्चितच शिकवेल. त्यामुळे येणाऱ्या काळात ताडोबा हे आपल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमातून पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातंर्गत आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डचे त्यांनी आज लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळयानंतर फुलपाखरांमध्ये रमलेल्या जंगला शेजारील शाळांमधील विद्यार्थ्यांना व पर्यावरण प्रेमींना संबोधित करताना त्यांनी ताडोबा येथील पराक्रमी वाघांच्या उपलब्धते सोबतच विविध माहितीपूर्ण प्रकल्पांनी नव्या स्वरुपात पर्यटकांपुढे लवकरच येईल, असे सूतोवाच केले. पुढच्या दोन वर्षात ताडोबा पर्यटनाच्या नकाशावरील पहिल्या पसंतीचे स्थळ असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आज आगरझरीच्या बटरफ्लाय वर्ल्डचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पामुळे ज्या गावांना रोजगार मिळत आहे. त्या गावांच्या नागरिकासोबत संवाद साधला. चंद्रपूरमध्ये एखादा उद्योगपती जितका रोजगार निर्माण करु शकत नाही. तितका मोठा रोजगार पराक्रमी वाघांमुळे मिळत आहे. यामध्ये उत्तरोत्तर वाढच होईल. त्यासाठीच आगरझरी व परिसरात येत्या काळामध्ये वाघ बघायला येणा-या पर्यटकांना मोठया प्रमाणात पर्यावरणाचे धडे देणारे, पर्यावरणावर प्रेम करायला शिकवणारे आणि पर्यावरणाबद्दल शिक्षित करणारे अनेक प्रकल्प बघायला मिळतील, असे स्पष्ट केले.